रत्नागिरी: शेळ्या-मेंढ्यांसह पकडलेल्या बोटीने केला होता दुबई, आखाती देशांचा प्रवास | पुढारी

रत्नागिरी: शेळ्या-मेंढ्यांसह पकडलेल्या बोटीने केला होता दुबई, आखाती देशांचा प्रवास

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : सीमा शुल्क विभागाने शेळ्या, मेंढ्या घेऊन जाणारी पकडलेली बोट यापूर्वी आठ वेळा दुबई व अन्य आखाती देशांमध्ये जाऊन आल्याची प्राथमिक माहिती चौकशीत पुढे आली आहे. या नौकेची कागदपत्रेही बनावट असल्याचा संशय असून पकडलेल्या 16 खलाशांपैकी काहींची ओळख पटली आहे. परंतु यांच्या म्होरक्याचा अद्याप ठावठिकाणा लागला नसल्याची माहिती सीमा शुल्कच्या अधिकार्‍यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गुजरातच्या दिशेने जाणार्‍या नौकेला सीमाशुल्क विभागाच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्री बाणकोटच्या सागरी हद्दीमध्ये पकडले होते. ही बोट प्रवास करताना 107 नॉटीकल मैल अंतर इतक्या आत समुद्रातून जात होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी सुरक्षा हद्दीबाहेरुन काही नॉटीकल मैल प्रवास केला. त्यामुळे सिंधुदुर्गमधून निघालेल्या या बोटीचा सीमा शुल्क विभाग व सुरक्षा यंत्रणांनी तब्बल पाच तास शोध घेऊनही ती सापडली नव्हती. ही नौका योजनाबध्द कट करुनच सागरी हद्दीबाहेरुन गेली असावी, असा संशय आहे. 75 नॉटीकल मैल अंतरावर बाणकोटनजीक ही नौका पकडण्यात आली होती.

यावर असणार्‍या तांडेल व खलाशी अशा 16 जणांची चौकशी सुरु आहे. यातील तांडेल व्यतिरिक्त अन्य एकाही खलाशाला हिंदी किंवा अन्य भाषा समजत नसल्याचे पुढे आले आहे. या 16 पैकी काही जणांची ओळख कागदपत्रांवरुन पटवण्यात आली आहे. काही खलाशांच्या कागदपत्रांची छाननी सुरु आहे. यासर्व प्रकरणात ज्या व्यक्तीचे नाव पुढे आले आहे, त्या म्होरक्याची ओळख पटवण्यात अद्याप तपास यंत्रणेला यश आलेले नाही. ही बोट यापूर्वी तब्बल 8 वेळा शेळ्या-मेंढ्या घेऊन दुबई व अन्य आखाती देशांमध्ये गेली आहे. त्यादृष्टीनेही सीमा शुल्क विभाग व सुरक्षा यंत्रणा तपास करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button