चला पर्यटनाला : रत्नागिरीच्या सागरी पर्यटनाला‘वॉटर स्पोर्टस्’ चा ‘बूस्टर’ | पुढारी

चला पर्यटनाला : रत्नागिरीच्या सागरी पर्यटनाला‘वॉटर स्पोर्टस्’ चा ‘बूस्टर’

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : सुट्ट्या सुरू झाल्यामुळे पर्यटकांची पावले आता गोव्याबरोबरच कोकणात वळू लागली आहे. सागरी किनार्‍याचे व समुद्रात डुंबण्याचा आनंद लुटण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना आता ‘वॉटर स्पोर्टस्’ने भुरळ घातली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर व रत्नागिरी तालुक्यातील अनेक किनार्‍यांवर स्थानिकांनी सुरू केलेले हे वॉटर स्पोर्टस् पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. रत्नागिरी-गणपतीपुळे सागरी मार्गावरील नेवरे-काजिरभाटी किनार्‍यावर असणार्‍या स्कूबा डायव्हिंगकडेही पर्यटक आकर्षित होताना दिसत आहेत.

जिल्ह्यातील दापोली तालुका हा मुंबई, ठाणे, पुण्यातील पर्यटकांसाठी अंतराने जवळ पडत असल्याने या भागातील पर्यटक मोठ्या संख्येने येथील किनारपट्टीवर फिरण्यासाठी व मासळी खाण्यासाठी येतात. कोरोनानंतर पर्यटनासाठी आता चांगले दिवस येऊ लागले आहेत. त्यामुळे दापोली तालुक्यातील कर्दे, पालांदे व मुरूड समुद्रकिनार्‍यांवर स्थानिक तरुणांनी वॉटर स्पोर्टस् सुरू केले आहेत. सुट्टीच्या दिवसांत पर्यटकांचा वॉटर स्पोर्टस्ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

दापोलीप्रमाणेच गुहागर समुद्रकिनार्‍यावर आणि रत्नागिरी तालुक्यात गणपतीपुळे, मालगुंड, नेवरे-काजिरभाटी याठिकाणी वॉटर स्पोर्टस् सुरू आहेत. वॉटर स्पोर्टस्मध्ये जेट स्की, फेरीबोट, बनाना राईड, ड्रॅगन राईड, बंपर राईडसह पॅरासेलिंगचाही थरार पर्यटक समुद्रकिनार्‍यावर अनुभवत आहेत. गुहागर शहराला लागूनच समुद्रकिनारा असल्याने व्याडेश्वराचे दर्शन घेऊन पर्यटक थेट समुद्रकिनार्‍यावर जात असतात. चिपळूणहून रेल्वेस्टेशन किंवा महामार्गावरून गुहागर 45 किलोमीटर अंतरावर असून, या किनार्‍याला पर्यटकांचा ओघ वाढत आहे. गणपतीपुळे हे धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून जगभरात ओळखले जात असतानाच आता सागरी खेळांसाठीही पर्यटकांचा ओढा वाढत आहे. गणपतीपुळे येथे सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी अंधार पडेपर्यंत हे वॉटर स्पोर्टस् सुरू असतात. गणपतीपुळेनजीक असणार्‍या मालगुंड या कवी केशवसुतांच्या भूमीमध्येही किनार्‍यावर वॉटर स्पोर्टस्चा थरार पर्यटक अनुभवत आहेत.

पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य

गणपतीपुळे समुद्रकिनार्‍यावर वॉटर स्पोर्टस्चा थरार पर्यटकांना अनुभवता येणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येेते. माफक दरात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सुट्टीचा हंगाम सुरू झाला असला तरी अद्याप पाहिजे त्यापद्धतीने पर्यटक यायला सुरुवात झालेली नाही. समुद्रातील चित्त थरारक कसरतींसाठी व पर्यटकांना आनंद देण्यासाठी आम्ही सर्व सज्ज आहोत असे मोरया वॉटर स्पोर्टस् अँड बीच असोसिएशन उदय पाटील यांनी सांगितले.

मुरूड, पालांदे, हर्णे येथे कसे जाल

पश्चिम महाराष्ट्र आणि पुण्यातून येणार्‍या पर्यटकांना कराडमार्गे चिपळूणला येऊन खेड व दापोलीमार्गे मुरूडला पोहोचता येते
खेडवरून दापोली 45 किलोमीटर तर दापोलीतून 10 ते 12 कि.मी. मुरूड समुद्रकिनारा,पालांदे येथून 2 ते 3 कि.मी.वर कर्दे आहे.

गुहागर किनार्‍यावर कसे जाल

प. महाराष्ट्र किंवा पुण्यातून येणारे पर्यटक कराडमार्गे चिपळूण व तेथून गुहागरला जाता येते.

गणपतीपुळे, मालगुंड आणि नेवरे येथे कसे जाल

पश्चिम महाराष्ट्र व पुण्यातून येणार्‍यांनी आंबा घाट मार्गे रत्नागिरीत आल्यास रत्नागिरी-गणपतीपुळे सागरी महामार्गाने
21 कि.मी. अंतर. सर्वच ठिकाणी हॉटेल व्यवस्था आहे. रत्नागिरीत गणपतीपुळे येथे एमटीडीसी व गणपतीपुळे देवस्थानची निवास व्यवस्था आहे.

Back to top button