नगर : वाळू तस्करी, ठेकेदारी बंद झाल्याने आरोप; विखेंचा महाविकास आघाडीवर पलटवार | पुढारी

नगर : वाळू तस्करी, ठेकेदारी बंद झाल्याने आरोप; विखेंचा महाविकास आघाडीवर पलटवार

नगर तालुका; पुढारी वृत्तसेवा : वाळू तस्करी, अवैध धंदे, ठेकेदारी बंद झाल्याने विरोधकांकडून बिनबुडाचे आरोप सुरू आहेत. अवैध धंद्यांतून सुरू असलेले गुन्हेगारीचे साम्राज्य बंद करण्यात सरकारला यश आले आहे. विरोधक शेतकर्‍यांसाठी काय करणार, हे सांगण्याऐवजी केवळ आमच्यावर टीका करण्यात दंग आहेत, अशी टीका खासदार सुजय विखे यांनी केली.

माजी खासदार कै. दादा पाटील शेळके नगर कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूक अनुषंगाने माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांसाठी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात

आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बबनराव पाचपुते होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, अक्षय कर्डिले, अभिलाष घिगे, विलास शिंदे, दादाभाऊ चितळकर, रमेश भांबरे, संतोष म्हस्के, रेवणनाथ चोभे, दिलीप भालसिंग, दीपक कार्ले, संभाजी लोंढे, अरुण होळकर, दत्ता नारळे, अशोक झरेकर, मनोज कोकाटे, सुनील पवार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार विखे म्हणाले, सरकारने जाहीर केलेल्या कांदा अनुदानाबाबत ऑनलाईन नोंदणीची अट शिथिल केली जाणार आहे. विळद येथील धक्क्यावरून रेल्वेने शेतकर्‍यांना कांदा वाहतूक करता यावी, यासाठी तेथे बाजार समितीमार्फत गोदाम बांधण्यात येणार आहे. विखे गप्पच राहून विरोधकांना दोन आकड्यांच्या पुढे जाऊ देणार नाहीत. चोरांना समोर चोरच दिसतात. स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मरणार्थ शेतकर्‍यांना संरक्षण देऊन त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार आहे. ग्रामपंचायतीला अनामत जप्त झालेले आमदारकी किंवा खासदारकीवर बोलतात हे हास्यास्पद आहे, असेही विखे म्हणाले.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले म्हणाले, बाजार समितीची पूर्वी काय अवस्था होती, आमची सत्ता आल्यानंतर भव्य इमारत उभी राहिली. यामध्ये भानुदास कोतकर यांचे मोठे योगदान आहे. बाजार समिती बाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोतकर यांच्या कार्याचे कौतुक केले होते. त्यांचेच नेते बाजार समितीच्या कामावर टीका करतात हे हास्यास्पद आहे.

कोरोना काळात बाजार समितीने कोविड सेंटर सुरू करून अनेक रुग्णांची सेवा केली. दुष्काळात छावणी सुरू करून पशुधन वाचविले. त्यातही विरोधक राजकारण करत आहेत. जिल्हा परिषदेत चौकीदार येण्याअगोदर यांचे नेते तेथे बसत होते. टक्केवारी शिवाय कामे झाली नाही. जिल्हा दूध संघाच्या जागा विक्रीचा निर्णय सात तालुक्यातील नेत्यांनी घेतला. मी संचालक तसेच चेअरमन नव्हतो. तरीही माझ्यावर आरोप होत आहेत. हा बालिशपणा आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांना आमदार होता आले नाही, त्याचं शल्य म्हणून बिनबुडाचे आरोप सुरू आहेत.

बाजार समितीत भ्रष्टाचार होत होता, तर तुम्ही मंत्री असताना चौकशी करून कारवाई करण्याची गरज होती. तुम्ही सत्तेचा गैरवापर करून प्रशासक नियुक्त केला. आजोबांच्या नावाने साखर कारखाना काढला. पण, त्याचे वाटोळे केले, अशी टीकाही कर्डिले यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यावर केली.

शहरातील अतिक्रमणे दहा दिवसांत हटविणार
शहरात व्यापार्‍यांवर हल्ले होत असताना पोलिस काय करतात. अवैध धंदे जोमात सुरू आहेत. याला वेळीच आवर न घातल्यास महिला, मुली रस्त्यावर फिरू शकणार नाहीत. शहरातील अतिक्रमणे दहा दिवसांत हटविणार असल्याचे खासदार विखे यांनी सांगितले.

..दहशत म्हटले तरी चालेल
तालुक्यात कोणालाही चुकीचे काम करू देणार नाही. शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी चुकीचे काम करणार्‍यांना नीट करणार असून, त्याला तुम्ही दहशत, दादागिरी म्हटले तरी चालेल, असे कर्डिले यांनी विरोधकांना सुनावले.

Back to top button