Young farmer : युवा शेतकर्‍याची चार एकरवर फूलशेती, वर्षाकाठी पाच लाखांचे उत्पन्न  | पुढारी

Young farmer : युवा शेतकर्‍याची चार एकरवर फूलशेती, वर्षाकाठी पाच लाखांचे उत्पन्न 

गजानन लोंढे, हिंगोली : पारंपरिक शेतीला फाटा देऊन बाजारात बारमाही मागणी असलेल्या फुलांची शेती करून औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथील युवा शेतकर्‍याने आर्थिक प्रगती साधली आहे. चार एकरच्या फूल शेतीतून खर्च वजा जाता वर्षाकाठी पाच लाखांचे उत्पन्न मिळत आहे. (Young farmer)

औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथील कैलास गणेशराव वानखेडे यांच्याकडे वडिलोपार्जित 12 एकर शेती आहे. परंतु, यापूर्वी ते हंगामानुसार पिके घेत असतं. सुरूवातीला त्यांनी सोयाबीन, हरभरा, हळद यासारख्या पिकातून उत्पन्न काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, निसर्गाने साथ दिली नाही. त्यामुळे हळूहळू कैलास हा फुलशेतीकडे वळला.

एक एकर क्षेत्रावर गुलाबाची लागवड

आपल्या चार एकर शेतामध्ये कैलासने एक एकर क्षेत्रावर गुलाबाची तर उर्वरित तीन एकर क्षेत्रावर असपेरा, ब्ल्यू डीजी, गलांडा, कलर अष्टर, गोल्डन बुके नावाच्या फुलांची लागवड केली. विशेष म्हणजे गुलाबाला बारमाही मागणी राहत असल्याने त्यांनी एक एकर क्षेत्रावर गुलाबाची लागवड करून त्याची जोपासना केली आहे. आठ दिवसातून बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची फवारणी करून पिकाची निगा राखली जात आहे. चार ते पाच दिवसाआड पाणी दिल्या जाते. ठिबकद्वारे पाणी दिले जात असल्याने पाण्याची बचतही होत आहे. चार एकर क्षेत्रातून खर्च वजा जाता वर्षाकाठी पाच ते सात लाखांचे उत्पन्न पदरात पडत आहे. आगामी काळात आधुनिक फूल शेती करून दर्जेदार फुलांची निर्मिती करण्यावर भर देण्याचा निर्धार कैलास वानखेडे यांनी केला आहे. फुलशेतीमध्ये त्यांचे संपूर्ण कुटुंब परिश्रम करतात. आई, वडील, भाऊ, पत्नी, भावजयी यांचाही कैलास यांना मोठा हातभार मिळत आहे. आपल्याच शेतात त्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळत असल्याने त्यांना आर्थिक लाभ मिळत आहे.

Young farmer : बारावीपर्यंत शिक्षण

माझे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शेतात वेगळा प्रयोग करण्याच्या दृष्टीने मी सुरुवातीला गलांडा फुलांची लागवड केली. हळूहळू बाजाराचा कल लक्षात घेऊन गुलाबासह इतर फुलांचीही लागवड केली आहे. यातून चांगले उत्पन्न मिळत आहे. भविष्यात बँकेकडून कर्ज उपलब्ध झाल्यास पॉली हाऊसमध्ये फूल लागवड करण्याचा मानस असल्याचे कैलास वानखेडे यांनी सांगितले.

हेही वाचा 

 

Back to top button