पुणे : शेतीमालाला हमी बाजार मिळविण्यासाठी जागतिक बाजारपेठेचे ज्ञान, शेतीमालाचे मार्केटिंग याबरोबरच उत्तम पॅकिंगही महत्त्वाची : विरोधी पक्ष नेते अजित पवार | पुढारी

पुणे : शेतीमालाला हमी बाजार मिळविण्यासाठी जागतिक बाजारपेठेचे ज्ञान, शेतीमालाचे मार्केटिंग याबरोबरच उत्तम पॅकिंगही महत्त्वाची : विरोधी पक्ष नेते अजित पवार

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : आजमितीला तरुणवर्गाने शेती करताना शेतीला जोडधंदा म्हणून पूरक व्यवसाय करणे अत्यंत गरजेचे आहे. शेतीमालाला हमी बाजार मिळविण्यासाठी जागतिक बाजारपेठेचे ज्ञान, शेतीमालाचे मार्केटिंग याबरोबरच उत्तम पॅकिंगही महत्त्वाची आहे. त्यासाठी ठिकठिकाणी भरणाऱ्या कृषी महोत्सवास भेट देऊन माहिती घेणे आवश्यक असल्याचे मत राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी व्यक्त केले.

रविवारी (दि. १२) ग्रामोन्नती मंडळाच्या श्रीमती एस आर केदारी बालक मंदिर, अण्णासाहेब नवरे तांत्रिक शिक्षण केंद्र या नूतन इमारतींचे उद्घाटन करून कृषी महोत्सव २०२३ समारोप व कृषी सन्मान सोहळा कार्यक्रमा दरम्यान तेे बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात थोर पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून झाली. प्रास्ताविक ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषीरत्न अनिलतात्या मेहर यांनी केले. यावेळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आमदार अतुल बेनके, भीमाशंकर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, बाजार समितीचे माजी सभापती संजय काळे, अशोक घोलप, देवदत्त निकम, पांडुरंग पवार, शरद लेंडे, अंकुश आमले, मोहित ढमाले, ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर, अध्यक्ष प्रकाश पाटे, विश्वस्त श्रीकांत विद्वास, उपाध्यक्ष सुजित खैरे, कार्यवाह रवींद्र पारगावकर, अरविंद मेहर, आनंद कुलकर्णी, संचालक मंडळ, तालुक्यातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी व कर्मचारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

यावेळीअजित पवार म्हणाले, मागील काळात शेतीचे महत्व व श्रमाची प्रतिष्ठा कमी होत चालली होती पण ह्या पुढील काळात शेतीला चांगले दिवस येणार आहे. कृषी मंत्री असताना शरद पवार यांनी आखलेल्या कृषी धोरणामुळे आज भारताकडे मुबलक कडधान्य उपलब्ध आहे. शेतकरी वर्गाने शेती करताना माती परीक्षण करून त्या दृष्टिकोनातून खतांचा वापर केला पाहिजे. वारंवार उसाचे पीक घेतल्यामुळे जमिनीचा पोत कमी होतो, त्यासाठी कृषी विज्ञान केंद्रातून माहिती घेऊन पिक घेणे गरजेचे आहे.

येणाऱ्या काळात कमी वेळेत कमी पाण्यावर द्रव खतांवर चांगले उत्पन्न देणाऱ्या वाणाचे संशोधन होणे गरजेचे आहे व याबाबतची माहिती आपल्याला कृषी केंद्रातून भरवण्यात येणाऱ्या कृषी प्रदर्शनातून मिळत असते. त्याचे आपण ज्ञान घेतले पाहिजे. कृषी महोत्सवासाठी जिल्ह्यातील संस्थांनी पुढाकार घेऊन हातभार लावण्याची गरज आहे. नवीन पिढीने स्पर्धात्मक शेती करणे आवश्यक आहे. या पुढील काळात ऊस तोडणीसाठी मजूर मिळणे कठीण होऊन बसणार आहे. त्यासाठी साखर कारखान्यांना हार्वेस्टर देण्यासाठी जिल्हा बँकेने पुढाकार घेण्याच्या सूचना यावेळी पवार यांनी दिल्या.

रासायनिक खत व औषधाच्या वापराने अनेक प्रकारचे आजार निर्माण होत असल्याचे चित्र पहावयास भेटत आहे. त्या दृष्टिकोनातून विषमुक्त शेती करून अन्न धान्याचे उत्पादन घेणे गरजेचे आहे. यापुढील काळात कृषी मालावर प्रक्रिया करण्याच्या उद्योगाला चालना देणे गरजेचे आहे व त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न चालू असल्याचे
पवार यांनी सांगितले.

यावेळी प्रगतशील शेतकरी, प्रगतशीत महिला शेतकरी, महिला उद्योजक, कृषी उद्योजक, उत्कृष्ट महिला बचत गट, प्रगतशील पशुसंवर्धन शेतकरी व कृषी पत्रकारिता यांना कृषी सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शिवजन्मभूमीची आम्रगाथा व आंबा उत्पादक मार्गदर्शिका या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री छगन भुजबळ ,दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मेहबूब काजी, सुनील ढवळे, राहुल घाडगे यांनी तर उपस्थितांचे आभार ग्रामोन्नती मंडळाचे कार्यवाह रवींद्र पारगावकर यांनीं मानले.

सरकारवर पवार यांचे टीकास्त्र

शेतीला योग्य प्रमाणात वीज पुरवठा करायचा नाही, शेतीला आवश्यक असणाऱ्या खत, औषधांचे भाव, विजेचे भाव वाढवायचे व शेतकऱ्याला चांगली व उत्तम प्रकारची शेती करा असे सांगणारे हे शेतकरी विरोधी सरकार आहे. जे आमदार सरकारसोबत आले त्यांच्या कामाला चालना व जे विरोधात आहेत त्यांच्या कामाला स्थगिति देणारे हे सरकार आहे. अशा पद्धतीने सर्वसामान्य जनतेची कामे होतील का?असा सवाल अजित पवार यांनी केला.

Back to top button