एकात्मिकद्वारे सेंद्रियकडे वळणे आता होईल अनिवार्यच

Published on
Updated on

पराग परीट

रासायनिक खतांवर बंदी घालण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. शासनस्तरावर रासायनिक खतांना सेंद्रिय पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत वेगवेगळ्या स्तरावर सध्या अभ्यास गट कार्यरत आहेत. शिवाय ज्या-ज्या ठिकाणी सेंद्रिय शेतीवर काम चालू आहे, अशा ठिकाणची निरीक्षणे आणि नोंदी संकलित करण्याचे काम सुरू आहे.

हरितक्रांतीपासूनच देशातील शेतकर्‍यांना जलद गतीने वाढणारे, जास्त उत्पादनक्षम संकरित वाण आणि त्यांच्या वाढीसाठी पूरक रासायनिक खते यांचा वापर करणे आवश्यक असल्याचे पटवून देण्यात आले. त्या काळात देशातील जनतेचे पोट भरण्यासाठी धान्य पिकांची उत्पादन वाढ आवश्यकच होती; पण सध्या ज्या पद्धतीने सर्रास सर्वच पिकांमध्ये रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके यांचा अति वापर केला जात आहे आणि याद्वारे मानवी आरोग्य आणि पर्यावरणीय गंभीर समस्या निर्माण होत आहेत, यावर शासनस्तरावर रासायनिक खते आणि त्यानंतर रासायनिक कीटकनाशके, बुरशीनाशके यावर टप्प्याटप्प्याने बंदी घालण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शासनाने अशा प्रकारचा निर्णय घेतला तर त्याचा शेतकर्‍यांच्या पीक उत्पादनाला मोठा फटका बसेल आणि उत्पादन कमी झाल्यामुळे नाईलाजाने परदेशातून शेतीमाल आयात करावा लागेल असा एक विचारप्रवाह सध्या ऐकावयास मिळत आहे. पण अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला तर त्याकडे खरं तर सकारात्मक पद्धतीने पाहण्याची गरज आहे.

श्री सिद्धगिरी मठ, कणेरी या ठिकाणी पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने शेती पिकवली जाते. याठिकाणी आंबा, चिक्कू, केळीच्या बागांमधे उत्तम दर्जाच्या आणि तुलनात्मकद‍ृष्ट्या पाहिल्यास व्यापारी हेतूने करण्यात येणार्‍या फळबागेइतकेच उत्पादन निघते. भाजीपाला, फूलशेती, भात याचे उत्पादनही चांगले येते.

भविष्यात रासायनिक शेती निविष्ठांवर बंदी येईल हा विचार करून शेतकरी बांधवांनी आतापासून पर्यायांचा वापर वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. यासाठी आता सुरुवातीच्या टप्प्यात एकात्मिक खत व्यवस्थापनेचा अवलंब करावा. याचाच अर्थ आज आपण आपल्या शेतात ज्या-ज्या रासायनिक निविष्ठांचा वापर करतो त्यांची तितकी खरंच गरज असते का याचा विचार करावा.  पिकांच्या वाढीनुसार त्यांना लागणार्‍या अन्‍नद्रव्यांची माहिती घेणे, माती तपासून त्याच्या अहवालावरून जमिनीतील उपलब्ध आणि कमतरता असलेल्या घटकांची माहिती घेऊन खत व्यवस्थापन करणे, वर्षातून किमान एकदा तरी हिरवळीच्या खतासाठी ताग, धैंचा, चवळी, मूग, शेवरी, गवार यापैकी एखादे पीक घेऊन जमिनीत गाडणे, घरच्या जनावरांचे जास्तीत जास्त शेणखत स्वतःच्या शेतात टाकणे, जैविक बीजप्रक्रिया, जैविक पीक रक्षक सापळे यांचा वापर वाढवणे, सापळा पिकांची लागवड करणे यासारखे उपाय अवलंबून आपण एकात्मिक खत आणि पीक संरक्षक उपाय योजू शकतो आणि या माध्यमातून टप्प्याटप्प्याने आपली शेती सेंद्रियमध्ये परावर्तीत करू शकतो. 

रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशकांवरील बंदीचा शासन निर्णय ज्यावेळी कधी घेतला जाईल तेव्हा त्याचा फटका बसू न देता उत्पादकतेत कसलाही फरक पडू न देण्यासाठी त्याद‍ृष्टीने आतापासूनच पावले उचलणे आवश्यकच नाही तर अनिवार्य आहे.

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news