तडका : माघारीचा विक्रम | पुढारी

तडका : माघारीचा विक्रम

सध्या निवडणुकांच्या काळात इंदूर आणि सुरत या स्वच्छ शहरांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसाही या दोन्ही शहरांचा आणि मराठी माणसांचा खूप जवळचा संबंध आहे. छत्रपती शिवरायांनी सुरतेवर स्वार्‍या करून इतिहासात सुरतेचे नाव अजरामर करून ठेवले आहे. इंदूरमध्ये असंख्य मराठी भाषिक लोक आहेत आणि होळकर कुटुंबाचे साम्राज्यही इंदूरमध्येच होते.

सध्या सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये या दोन्ही शहरांमधील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेऊन नवाच विक्रम प्रस्थापित केला आहे. सुरत शहरातील उमेदवाराने अर्ज फेटाळला जावा, याद़ृष्टीने त्यात मुद्दाम काही त्रुटी ठेवल्या. उदाहरणार्थ, सूचक आणि अनुमोदक यांच्या खोट्या सह्या केल्या. बहुधा हे सर्व काही कटकारस्थान करून केले असावे, अशी शंका घेण्यास जागा आहे. तो अर्ज बाद केला, तेव्हा रिंगणामधून काँग्रेस पक्षाचे उमेदवार बाहेर पडले होते. एखादा दिवस बाकी होता.

सत्ताधारी पक्षाने रिंगणात असलेल्या आठ अपक्ष उमेदवारांना समजेल अशा पद्धतीने समजावून सांगितले आणि त्या आठही अपक्ष उमेदवारांनी खूपच मोठा समजूतदारपणा दाखवत आपापले अर्ज मागे घेतले आणि सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला बिनविरोध निवडून दिले. आज सत्ताधारी पक्षाला या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवाराच्या माध्यमातून आपले खाते लोकसभेमध्ये उघडता आले. तुम्हास असा प्रश्न पडेल की, असे कसे होऊ शकते? ज्याला पक्षाने उमेदवारी दिली आहे, ती विचार करूनच दिली असणार. यानेही ती मागितली असणार. इतरांचा विचार न करता निवडून येण्याची क्षमता पाहून याच उमेदवारावर पक्षाने विश्वास टाकला असणार. त्याच पक्षाचा विश्वासघात करून तो उमेदवार ऐनवेळेला रिंगणातून माघार घेतो आणि इतरही अपक्ष उमेदवार माघार घेतात.

संबंधित बातम्या

आपण उमेदवार निवडण्यात चूक केली, हे कधीही कुणी मान्य करत नाही; परंतु झालेली चूक जनतेच्या लक्षात आलेली असते. कोणताही पक्ष 100 टक्के बहुमतात कधीच निवडून येत नसतो. सुरतच्या लोकसभेच्या मतदारांमध्ये असंख्य मतदार काँग्रेस पक्षालाही मते द्यायला उत्सुक असतील; पण पक्षानेच बेजबाबदार उमेदवार दिल्यामुळे त्या सर्वांचा तो हक्क डावलेला गेला आहे. इंदूरमध्ये काँग्रेसने काही एक विचार करून एक उमेदवार दिला. त्याने अर्जही दाखल केला आणि प्रचारही सुरू केल्याचे नाटक केले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या काही तास आधी हा उमेदवार सत्ताधारी पक्षाच्या काही मंत्र्यांना घेऊन निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गेला.

तिथे त्याने स्वतःचा अर्ज परत घेतला आणि अवघ्या तासात भाजपमध्ये प्रवेश केला. या उमेदवाराला सत्ताधारी पक्षाने काही एक समजावून सांगितले असावे. समजावून सांगण्याचे दोन प्रकार असतात- सरळ पद्धतीने समजावून सांगणे आणि वाकड्या पद्धतीने समजावून सांगणे. सरळ पद्धतीने म्हणजे पक्षाची ध्येय-धोरणे त्याला नीट समजावून सांगणे. वाकड्या पद्धतीने समजावून सांगणे म्हणजे असे नाही केलेस तर कसे-कसे होऊ शकते, याचे भयावह चित्र त्याच्या डोळ्यांपुढे उभे करणे. त्याच्या काही ना काही पूर्वीच्या भानगडींची त्याला आठवण करून देणे. थोडक्यात म्हणजे त्याच्या फायली त्याला दाखवून त्या आता उघडल्या जातील, असे सांगणे. या दोन्हीपैकी एका प्रकारात उमेदवाराची विकेट नक्की जात असते.

Back to top button