सांगली : माजी आमदार सदाशिव पाटील पुन्हा विधानसभेत जातील : वाकचौरे | पुढारी

सांगली : माजी आमदार सदाशिव पाटील पुन्हा विधानसभेत जातील : वाकचौरे

विटा; पुढारी वृत्तसेवा : जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्ह्यात राष्ट्रवादी बळकट होईल आणि आमचे मित्र माजी आमदार सदाशिव पाटील पुन्हा विधानसभेत जातील, असा विश्वास राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाकचौरे यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विटा (जि. सांगली) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पुढे बोलताना माजी आमदार वाकचौरे म्हणाले, आपल्याला माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासारखे चांगले नेतृत्व लाभले आहे. सांगली जिल्हाचा त्यांनी चांगला विकास केला आहे. त्यांच्याकडून विकासाची दृष्टी घेऊन आपण काम करण्याची गरज आहे. त्यानंतर याप्रसंगी बोलताना माजी आमदार सदाशिव पाटील म्हणाले, जिल्ह्यात अतिशय ताकदीने कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणारे आणि विकासाचे नवे व्हिजन असणारे नेतृत्त्व म्हणून आपण आमदार जयंत पाटील यांच्याकडे पाहतो. समाजकारण, सहकार, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात त्यांनी उभारलेल्या संस्था आदर्शवत आहेत. अशा विकासाचा दृष्टीकोन असणाऱ्या नेत्यांना अधिक ताकद देण्यासाठी सर्वांनी एकजूटीने पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन ही पाटील यांनी केले.

जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. मुळीक यांनी, जिल्ह्याचा अभ्यास बारकाईने असणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. त्यांनी जिल्ह्याचा समतोल विकास साधण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. दुष्काळी भागाला न्याय देण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी ज्या विश्वासाने त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली, ती पाटील यांनी सार्थ ठरवली. मंत्रिमंडळात मिळालेल्या प्रत्येक खात्याचा अभ्यास करून योजना राबवल्या. त्यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी राज्यात क्रमांक एकचा पक्ष होईल, अशी अपेक्षाही अॅड. मुळीक यांनी व्यक्त केली.

माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस सांगली जिल्ह्यात सर्वत्र धुमधडाक्यात, साजरा करण्यात आला. यानिमित्ताने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिलेबी वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार संजय वाकचौरे बोलत होते. यावेळी माजी आमदार सदाशिव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, जिल्हा सरचिटणीस अॅड संदीप मुळीक यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुशांत देवकर, तालुकाध्यक्ष किसनराव जानकर, शहराध्यक्ष अविनाश चोथे, वक्ता सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जाधव, दत्तात्रय चोथे, विश्वनाथ कांबळे, महिला आघाडी तालुकाध्यक्षा सुवर्णा पाटील, शहराध्यक्षा लता मेटकरी, युवकचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष हरी माने, पूनम महापूरे, रविंद्र कदम, गजानन कदम यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button