बारामती : माझ्या भूकंपासंबंधीच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ घेतला : रोहित पवार | पुढारी

बारामती : माझ्या भूकंपासंबंधीच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ घेतला : रोहित पवार

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  लवकरच राज्यात भूकंप होईल, या माझ्या ट्विटचा अर्थ माध्यमांनी व सामान्य लोकांनी कसा घेतला आहे, त्यावरून लोकांच्या मनात काय आहे, हे दिसून येते. बदल झाला पाहिजे, ही भावना लोकांची असल्याचे त्यामागे दिसते, असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, माझे ट्विट हे जंगलामध्ये राहणाऱया प्राण्यांचा संदर्भ देवून केले होते. जंगलातील प्राण्यांना भूकंप होणार हे आधीचं कळतं. त्यांची आधीच लगबग सुरु होते. राजकीय क्षेत्रामध्ये जे आमदार असतात, ते लोकांना भेटतात, नेत्यांना भेटतात, त्यांना काही प्रमाणात अंदाज हा आधीच येत असतो.

सत्तेतील आमदारांच्या सध्याच्या चेहऱयावरील हावभाव, त्यांच्यात झालेला बदल, त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सुद्धा वाट बघावी लागते, अशी चर्चा आहे. अर्थमंत्रालय भाजपकडे आहे. तेथून एकाच पक्षाच्या फाईल्स क्लिअर होत आहेत. त्याला फार गती आली आहे. ही गती अस्थिरता डोळ्यासमोर दिसत असल्याने आली आहे. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर राजकीय भूकंप होईल का असा प्रश्न मी उपस्थित केला आहे.

मंत्रीमंडळ विस्तार नसल्याने कामे खोळंबली

शिवसेना हा पक्ष बदला घेण्यासाठी फोडण्यात आला. कोकणातील जागा भाजपला देण्यात आली, वास्तविक ती शिंदे गटाकडे जाणे अपेक्षित होते. न्यायालयात पक्ष व सत्ता संघर्षावर सुनावणी सुरु आहे. मंत्रीमंडळात स्थान मिळावे अशी अनेकांची इच्छा आहे. त्यामुळे मंत्रीपदे कोणाकोणाला देणार हा प्रश्न आहे. हा विषय लांबवत खेळवत ठेवण्याची रणनिती असू शकते. त्यामुळे सर्वसामान्यांचे नुकसान होत आहे. मंत्रीमंडळ विस्तार न झाल्याने सर्वसामान्यांची कामे खोळंबून आहेत, असे रोहित पवार म्हणाले.

दोन्ही पोटनिवडणूकांत मविआला यश

चिंचवडमध्ये पोटनिवडणूकीत लोकांची सहानुभुती जगताप कुटुंबियांना नक्कीच आहे. परंतु लोक भाजपाला मतदान करतील असे नाही. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला संधी दिली आहे. परंतु त्यांची क्षमता आहे का याचा अंदाज सर्वसामान्यांना आहे. त्यामुळे सहानुभूती त्यांच्या बाजूने असली तरी स्थानिक जनता भाजपला विरोध करते आहे. येणाऱया काळात हा फरक आपल्याला दिसेल. यासिवाय कसब्यात भाजपने पुढे आणलेले समिकरण लोकांना पटलेले नाही. त्यामुळे तेथेही भाजपच्या विरोधात निकाल लागेल, असे आमदार रोहित पवार म्हणाले.

फडणवीसांचे वक्तव्य सहानूभूतीसाठी

राज्यात सकाळी झालेल्या शपथविधीसंबंधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्धसत्य बोलते. अर्धे वर्ष सरल्यावर ते अर्धसत्य का बोलले. ते जर सुरुवातीला बोलले असते तर लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसला असता. निवडणूकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य करून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला असल्याचे जनतेचे मत आहे. त्यांचे हे वक्तव्य खरे नाही, हे आमचं म्हणणं आहे, असे आमदार पवार म्हणाले.

Back to top button