नाशिक : गोदाघाट परिसरातून वन्यजीवांचे दुर्मीळ अवयव हस्तगत, वनविभागाची कारवाई | पुढारी

नाशिक : गोदाघाट परिसरातून वन्यजीवांचे दुर्मीळ अवयव हस्तगत, वनविभागाची कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गोदाकाठावरील पूजा साहित्य विक्री दुकानांमध्ये खुलेआम मृत सागरी जीवांसह अन्य वन्यजीवांची अंधश्रद्धेपोटी विक्री होत असल्याची धक्कादायक बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. नाशिक वनवृत्ताच्या दक्षता पथकाने गुरुवारी (दि.९) पंचवटी परिसरात छापेमारी करत इंद्रजाल (ब्लॅक कोरल) व हाथजोडी (घोरपडचे गुप्तांग), हरणाची शिंगे, बिबट्यासदृश नखे, कासवाचे खवले, सापाची कात यांच्यासह अन्य वन्यजीव अवयव हस्तगत केले.

दक्षता विभागाच्या फिरत्या पथकाला पंचवटीतील गोदाकाठ परिसरात वन्यप्राण्यांच्या अवयवांची अवैधरीत्या विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे सापळा रचून संशयित धनेश टेकम (रा. फुलेनगर, पंचवटी, मूळ- नागपूर) याच्या दुकानावर छापा मारला. त्याच्याकडून १७ नग ‘ब्लॅक कोरल्स आणि सी फॅन्स’ म्हणजेच, ‘इंद्रजाल’, हाथजोडी (५), हरणाची शिंगे (५), सापाची कात, कासव खवले, हरणाचे तुटलेले शिंगे (५) हस्तगत केले. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अंतर्गत शेड्यूल 1 भाग 1 मध्ये येते, जे बाळगणे व विक्री करणे हा दंडनीय अपराध आहे. या कायद्यांतर्गत संशयित टेकमविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दक्षता विभागाचे विभागीय वनाधिकारी विशाल माळी, फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर, संजय पवार, वनपाल वैभव गायकवाड, वनरक्षक यू. जे. तांबे, एस. आर. कुवर, यू. जी. सय्यद, वाहनचालक हर्षल कोमटे, नारायण जाधव, मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले, वन्यजीवप्रेमी अभिजित महाले यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, संशयित टेकमची पुढील चौकशी उपवनसंरक्षक (पश्चिम) पंकज गर्ग व विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक गणेश झोळे व वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे करत आहेत.

हेही वाचा :

Back to top button