सिंधुदुर्ग : १ लाख ४१ हजार ३५७ बालकांची होणार सर्वांगीण आरोग्य तपासणी

सिंधुदुर्ग : १ लाख ४१ हजार ३५७ बालकांची होणार सर्वांगीण आरोग्य तपासणी
Published on
Updated on

ओरोस; पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'जागरूक पालक-सुद़ृढ बालक' अभियान 10 फेब्रुवारीपासून राबविण्यात येत आहे. या अभियानात 0 ते 18 वयोगटातील 1 लाख 41 हजार 357 बालकांची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात 197 आरोग्य पथके कार्यरत ठेवली आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात 0 ते 18 वयोगटातील मुलांची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यासाठी सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तर या आरोग्य तपासणीच्या कामासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाची 191 व जिल्हा सामान्य रुग्णालय 6 अशी एकूण 197 आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत. या अभियान कालावधीत शासकीय व निमशासकीय शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील 87 हजार 501, खासगी शाळांची 15 हजार 673, आश्रम शाळा 49, दिव्यांग शाळा 151, अंगणवाडी 34 हजार 526, खासगी नर्सरी बालवाडी 2 हजार 753, बालसुधार गृह 4, समाज कल्याण व आदिवासी विभाग वसतिगृहे 106, आणि शाळाबाह्य मुले 584 अशी एकूण 1 लाख 41 हजार 357 मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

या तपासणीमध्ये नवजात बालकांमधील जन्मजात व्यंग ओळखणे, रक्तशय, डोळ्यांचे आजार, गलगंड, दंतविकार, हृदयरोग, क्षयरोग, कुष्ठरोग, कॅन्सर, अस्थमा अशा आजारांच्या संशयित रुग्णांना ओळखून त्वरित संदर्भित करणे. तसेच दुभंगलेले ओठ व टाळू, मोतीबिंदू, बहिरेपणा, जीवनसत्त्व अ-ड-बची कमतरता, वाढ खुंटणे, लठ्ठपणा, यांचाही शोध घेतला जाणार आहे.

या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 0 ते 18 वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करून आजारी बालकांवर त्वरित उपचार करणे, गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा देऊन उपचार करणे, प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरवणे, सुरक्षित व सुद़ृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दल स्थापन करून या आरोग्य अभियान कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनानुसार कालबद्ध पद्धतीने आठ आठवड्यांत हे अभियान पूर्ण करावयाचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news