कोल्हापूर : साळशीची पाणीयोजना ग्रामस्थांच्या फायद्याचीच! | पुढारी

कोल्हापूर : साळशीची पाणीयोजना ग्रामस्थांच्या फायद्याचीच!

बांबवडे; पुढारी वृत्तसेवा :  साळशी (ता. शाहूवाडी) येथील ग्रामस्थांच्या ग्रामसभेतील मागणीनुसार शासनाची जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. योजनेसाठी अपारंपरिक ऊर्जास्त्रोताचा वापर होणार असून वीजबिलाच्या खर्चात बचत होणार आहे. गावाच्या फायद्याची योजना होत असताना ग्रामस्थांवर अतिरिक्त भार पडणार असल्याचा खोटा प्रचार सुरू आहे. फिल्टर हाऊसच्या माध्यमातून साळशीसह पोवारवाडी, भोसलेवाडी या संलग्न वाड्यांना स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असल्याने ही महत्वाकांक्षी योजना लवकरच मार्गी लागणार आहे, अशी माहिती माजी सरपंच संदीप पाटील-साळशीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

माजी सरपंच पाटील म्हणाले, साळशी (ता. शाहूवाडी) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताबदल झाला. जनमताचा कौल स्वीकारून गावच्या विकासासाठी सत्तेचा उपयोग होणे अपेक्षित आहे. शासनाने जलजीवन मिशन योजनेंतर्गत मंजूर केलेली पाणीपुरवठा योजना गावासाठी उपयुक्त आणि गरजेची आहे. परंतु राजकीय आणि आर्थिक हेतू साध्य होणार नसल्याचे लक्षात आल्यावर योजनेला खोडा घालण्याचे काम तथाकथित गटनेत्यांकडून सुरू आहे. वाढती लोकसंख्या पाहता सद्याची २० वर्षांपूर्वीची नळपाणी योजनेद्वारे गावाला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होऊ शकत नाही. संलग्न वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. ही बाब विचारात घेऊन आ. विनय कोरे, खा. धनंजय महाडिक, खा. धैर्यशील माने यांच्या प्रयत्नांतून गावासाठी पावणे पाच कोटी रुपये खर्चाची नवीन पाणी योजना मंजूर करण्यात यश मिळाले. यासाठी ग्रामसभेत तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य आणि विद्यमान सरपंचांनी जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर व्हावी, असा मांडलेला ठराव ग्रामस्थांनी मंजूर केला आहे. आता सत्ताबदल झाल्यावर लोकोपयोगी योजना बंद पाडण्यासाठी कटकारस्थान करून ग्रामस्थांचा विश्वासघात केला जात आहे. असा आरोप माजी सरपंच पाटील यांनी विद्यमान सत्ताधारी गटनेत्यांवर केला.

केंद्र आणि राज्य सरकारने पूरक बाबींची पडताळणी करूनच योजनेला मंजुरी दिली आहे. वर्क ऑर्डरनुसार जलकुंभसाठी जागा खरेदी केली आहे. कडवी नदीवरून पाईपलाईनच्या कामाला दोन दिवसांत सुरुवात केली जाणार आहे. सद्याच्या पाणीपट्टी करापेक्षा वाढीव बोजा पडणार नाही. योजनेबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरवून तथाकथित गटनेत्यांनी ग्रामविकासाच्या आडवे येण्याचा नवीन पायंडा पाडू नये, असे सूचनावजा आवाहनही सत्ताधारी गटाला उद्देशून माजी सरपंच पाटील यांनी केले आहे. यावेळी माजी उपसभापती महादेवराव पाटील, पाणीपुरवठा योजनेचे सहठेकेदार राजू मुगदूम उपस्थित होते.

‘राजकारणाच्या वेळी राजकारण जरूर करा. ग्रामविकासात राजकारण कशासाठी. उन्हाळ्यात पाण्यासाठी लोकांनी वणवण भटकणे योग्य नाही. याच जाणिवेतून नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली आहे. आपसातील राजकारणात गावाला झळ सोसावी लागू नये.
महादेवराव पाटील-साळशीकर माजी उपसभापती, शाहूवाडी

हेही वाचलंत का ?

Back to top button