कोपरगाव : जलतरण तलावाची वापराविनाच दुरवस्था | पुढारी

कोपरगाव : जलतरण तलावाची वापराविनाच दुरवस्था

कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा : येथील नगरपालिकेच्यावतीने सन 2009-10 साली वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सर्व्हे नंबर 1621, 1767 मध्ये अंदाजे पावणे दोन कोटी रुपये निधीच्या जलतरण तलावाची उभारणी केली आहे. मात्र, जलतरण तलाव वापरापासून वंचित आहे. जलतरण तलाव पूर्ण होऊन 12 वर्षे (एक तप) उलटले तरी अद्यापि वापरासाठी खुला करण्यात आला नाही. परिणामी या ठिकाणी असलेल्या जलतरण तलावाला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे.

प्रशस्त जागेत निर्माण करण्यात आलेल्या जलतरण तलावाच्या सभोवती गवत आणि झाडे झुडपे वाढली आहेत. तसेच चेंजिंग रूमच्या परिसरात झुडपे वाढल्याने इमारतीला अवकळा प्राप्त झाली आहे. संपूर्ण परिसर झाडा-झुडपांच्या विळख्यात सापडले आहे. कोटींचा निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या जलतरण तलावाची दुरवस्था झाली आहे.

गजानन नगर व महादेव नगर यांच्यामधील पट्ट्यात असलेल्या इनडोअर गेम हॉल परिसरात असलेल्या खुल्या जागेत जलतरण तलाव निर्माण करण्यात आला आहे. मात्र, कधीच सुरू न झालेल्या या तलावातील टाईल्स तुटलेल्या असून केरकचरा व धूळ साचलेली आहे. चेंजिंग रूम व शॉवरचीही तशीच अवस्था आहे. सभोवताली झाडीझुडपी व केरकचरा दिसून येतो. जलतरण तलावाला गवत आणि झाडा झुडपांनी वेढले आहे. सदर जलतरण खुले करण्याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष व निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा हल्लाबोल मनसेकडून करण्यात आला होता.

कोपरगाव येथील इनडोअर गेम हॉल भागात उभारण्यात आलेल्या जलतरण तलावाचे बारा वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत उद्घाटन करण्यात आले. मात्र, आजपर्यंत बंद अवस्थेत असलेल्या या जलतरण तलावाच्या देखभाल दुरुस्तीकडे पालिका प्रशासनाने कानाडोळा केल्याने व वापर झालेला नसल्यामुळे येथील जलशुद्धीकरण यंत्रणा नादुरुस्त झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे बारा वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या जलतरण तलावाची वापराविनाच दुरवस्था झाल्याचे चित्र असून यामुळे पालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कोपरगाव नगरपालिका क्षेत्रात उत्तम जलतरणपटू तयार व्हावेत यासाठी पालिकेकडून शहराच्या या भागात जलतरण तलावांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र त्यांना आजतागायत तलावाचा लाभ घेता आलेला नाही. अशाचप्रकारे 12 वर्षांपूर्वी जलतरण तलाव बांधण्यात आला असून वापराविनाच तलाव नादुरुस्त झाल्याच्या मुद्यावरून पालिका प्रशासनावर आता टीका होऊ लागली आहे.

जलतरण तलाव करण्यात आला. परंतु पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे शहरातील नागरिकांना त्याचा लाभ घेता आलेला नाही. त्यानंतर ही वास्तू धूळखात पडली असल्याचे दिसून येते. त्यामुळे ही वास्तू नागरिकांसाठी खुली करावी. जेणेकरून सर्वसामान्यांना त्याचा वापर करता येईल.

                                        – संतोष गंगवाल, जिल्हा उपाध्यक्ष, मनसे

Back to top button