कोपरगावात धुक्यासह हलक्या पाऊस धारा! | पुढारी

कोपरगावात धुक्यासह हलक्या पाऊस धारा!

कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात समाधानकारक पाऊस पडला तर उत्तर भारतात थंडीची लाट मोठ्या प्रमाणात आल्याने यंदा रब्बी हंगामात गारठ्याचे प्रमाण जास्त होते. त्यात 30 जानेवारी रोजी पहाटेपासून सकाळी 9 वाजेपर्यंत धुके व दहिवरासह हलकासा पाऊस पडल्याने शेतकर्‍यांचे कांदा, हरबरा, गहू, द्राक्षे, ज्वारी आदी रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

खरीपाच्या शेवटी तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. यात खरीप पिके हाताशी आली असताना अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले. रब्बी पिकांना समाधानकारक पाणी असल्याने बळीराजाने कष्टाने पिके घेतली, पण सोमवारी भल्या पहाटे धुके अन् दहिवर पडल्याने त्याचा मोठा फटका पिकांना बसला.

धुक्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविता येत नव्हती. भल्या सकाळी शहरात भाजीपाला व दुधाची ने- आण करणार्‍या शेतकर्‍यांना दुचाकी चालविताना मोठी काळजी घ्यावी लागली. धुक्याची चादर दाट असल्याने शेजारून कुठले वाहन चालले हेही समजत नव्हते. मुलांना सकाळची शाळा असल्याने वेळेत पोहोचता आले नाही. साखर कारखाना, दूध संघ, शाळा, महाविद्यालयातील नोकरदारांना ठेवुन दिलेले रेनकोट, स्वेटर, मफलर पुन्हा बाहेर काढावे लागले.

  • धुक्यामुळे कांद्यासह अन्य पिकावर कीड नियंत्रणासाठी महागडी किटकनाशके शेतकर्‍यांना फवारावी लागणार आहेत. रब्बीचे नियोजन पूर्णतः कोलमडले आहे.

Back to top button