अमरावती : कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे निधन | पुढारी

अमरावती : कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे निधन

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे पुणे येथे निधन झाले.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कुलगुरू म्हणून डॉ. दिलीप मालखेडे हे दीड वर्षांपूर्वीच रुजू झाले होते. कुलगुरू म्हणून रुजू झाल्यानंतर विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासामध्ये त्यांनी घेतलेला पुढाकार आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी आखलेली धोरणे सर्वांसाठी दिशादर्शक ठरली.

डॉ. मालखेडे यांनी पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तसेच अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद परिषदेचे सल्लागार म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. एक वर्षांपूर्वी त्यांना रक्ताशयाचा कर्करोग असल्याचे निदान झाले. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मध्यंतरी त्यांनी उपचाराला चांगला प्रतिसाद दिला होता. ते कर्तव्यावर रुजू झाले होते. दरम्यान त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. तेव्हापासून त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. अखेर शनिवारी (दि.२८) पहाटे पुणे येथे त्यांची प्राणज्योत मालवली. शैक्षणिक क्षेत्रातून शोक संवेदना व्यक्त केला जात आहे.

राज्यपालांनी वाहिली श्रद्धांजली

राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी आपल्‍या शोकसंदेशात म्‍हटले आहे की, ” संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांच्या निधनाची माहिती मिळताच अतिशय दुःख झाले. डॉ. मालखेडे यांनी पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे प्राध्यापक म्हणून तसेच अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे सल्लागार म्हणून उल्लेखनीय कार्य केले होते. विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासात आणि विशेषतः गुणवत्ता वाढविण्याच्या कार्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या अकाली निधनामुळे शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.”

हेही वाचा : 

Back to top button