नगर : जिल्हा काँग्रेस कमिटी झाली बरखास्त ; नाना पटोले यांचा आ. थोरात यांना धक्का

Congress
Congress
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा :  बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांना समर्थन करणारे काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांचे निलंबन तसेच ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त करत प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांना नगरमध्ये जोरदार धक्का दिला.  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून अहमदनगर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारीणी बरखास्त करण्यात येत असल्याचे पत्र काँग्रेस संघटन व प्रशासन सरचिटणीस प्रमोद मोेरे यांनी काढले आहे. माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी केली आहे.

काँग्रेसने विद्यमान आ. डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली असतानाही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता सत्यजित यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.  काँग्रेसशी हा दगाफटका असल्याचे सांगत तांबे पिता-पुत्रांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. असे असतानाही जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी तांबे यांचे समर्थन केले होते. त्यामुळे पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. मात्र या नोटीसीला उत्तर न देता साळुंके यांनी पक्षाकडे राजीनामा पाठविला. पाठोपाठ मोरे यांचे पत्रही धडकले. त्यामुळे साळुंके यांनी अगोदर राजीनामा दिली की पक्षाने त्यांचे निलंबन केले याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे. साळुंके हे माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक आहेत.

तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीवरही आ. थोरात यांचे वर्चस्व आहे. थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे हे बंडखोर उमेदवार असल्याने अनेक पदाधिकार्‍यांनी तांबे यांचे समर्थन केले होते. त्यामुळेच पक्षाने साळुंके यांच्या निलंबनासोबतच ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच बरखास्त केली. जिल्हा कमिटी बरखास्तीचा पक्षाचा हा निर्णय म्हणजे माजी मंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांना धक्का मानला जातो.

भाजपची भूमिका गुलदस्त्यात!
बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सर्वच पक्षाकडे पाठिंबा मागणार असल्याचे सांगितले होते. त्यातच नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपचा उमेदवारी नाही. त्यामुळे भाजप पाठिंबा देणार का? याकडे नजरा लागून असतानाच अद्यापही भाजपने भूमिका जाहीर केलेली नाही. तांबे यांनीही पाठिंबा मागितला नसल्याचे भाजपचे प्रदेश नेते सांगताहेत. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपची भूमिका नेमकी काय? हे अद्यापही समोर आलेले नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news