नाशिक : गुटख्याची राजरोसपणे वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांच्या हाती | पुढारी

नाशिक : गुटख्याची राजरोसपणे वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांच्या हाती

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा ; राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची शहरात मोठ्या प्रमाणात खरेदी -विक्री होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गुटख्याची राजरोसपणे वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांच्या हाती लागला असून, चालकास बेड्या ठोकत पथकाने टेम्पोसह गुटखा असा सुमारे सव्वाचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने औद्योगिक वसाहतीत ही कारवाई केली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलीप श्रीकांत पांडे (३२, रा. उपेंद्रनगर) असे अटक करण्यात आलेल्या गुटखा तस्कराचे नाव आहे. औद्योगिक वसाहतीतून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती युनिट २ च्या पथकास मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी (दि.२६) अंबड लिंक रोडवर पोलिसांनी वाहन तपासणी केली असता संशयित मुद्देमालासह पोलिसांच्या हाती लागला. एक्स्लो पॉइंटकडून पपया नर्सरीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनास अडवून पोलिसांनी तपासणी केली असता त्यात गुटख्याचा मोठा साठा आढळला. त्यात विविध प्रकारचा गुटखा, सुगंधी सुपारीचा समावेश आहे. संशयितास अटक करून पोलिसांनी टेम्पोसह गुटखा जप्त केला असून, या प्रकरणी हवालदार गुलाब सोनार यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button