मंचर : सरपंच- ग्रा.वि.अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव | पुढारी

मंचर : सरपंच- ग्रा.वि.अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव

मंचर(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : अवसरी बुद्रुक येथील सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यात विकासकामांबाबत समन्वय नाही. त्यामुळे विकासकामांवर परिणाम होऊन निधी परत जाण्याचे प्रकार घडत आहेत. निधी परत जात असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरपंच पवन हिले यांचा बैलगाडा असल्याने बैलगाडा शर्यतीच्या नादात अनेक वेळा ग्रामपंचायतीत ते येत नाहीत. सरपंच दांडी मारत असल्याने मासिक बैठक रद्द करावी लागत आहे.

गावात लाखो रुपयांची विकासकामे मंजूर आहेत, परंतु सरपंच पवन हिले यांना वेळ नसल्याने मंजूर झालेला निधी परत गेल्याने विकासकामांना खीळ बसत आहे. सरपंचांना ग्रामपंचायतीचा कारभार करण्यास वेळ मिळत नसल्यास सरपंचांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. हिंगेवस्ती येथील मुक्तादेवी मंदिरासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या निधीतून 17 नोव्हेंबर 2019 मध्ये तीन लाख रुपयांचा निधी पत्राशेड उभारण्यासाठी मंजूर झाला.

मात्र, त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी गेली दोन वर्षापासून पत्राशेड कामाबाबत सरपंच पवन हिले यांच्याकडे विचारणा केली असता थोड्याच दिवसात काम चालू होईल, अशी उडवाउडवीची उत्तरे ते ग्रामस्थांना सातत्याने देत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अखेर दोन वर्षा पत्राशेडचे काम सुरू न झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. 24) ग्रामविकास अधिकारी मोहन गर्जे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, पत्राशेडच्या कामाची मुदत 1 मार्च 2022 रोजी संपली आहे. मुदतवाढ घेऊन ते काम ग्रामपंचायत लवकरच करणार आहे. दरम्यान सरपंच पवन हिले यांच्याकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न साधला असता ते नेटवर्कच्या बाहेर असल्याने संपर्क होऊ शकला नाही.

Back to top button