भीमाशंकर : भाविकांची गैरसोय होऊ नये : माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील | पुढारी

भीमाशंकर : भाविकांची गैरसोय होऊ नये : माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

भीमाशंकर; पुढारी वृत्तसेवा : दि. 18 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र यात्रा व दि. 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती असून, यानिमित्त यावर्षी जास्त गर्दी होणार आहे. श्री क्षेत्र भीमाशंकरला यात्राकाळात भाविकांना सुविधा व सुरक्षा देण्यात याव्यात, तसेच विकास आराखड्याच्या कामांमुळे भाविकांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यात्रेचे नियोजन करण्यासाठी दिलीप वळसे पाटील यांनी भीमाशंकरचा पाहणी दौरा केला व देवस्थान विश्वस्त, ग्रामस्थ व अधिकारी यांची बैठक घेऊन यात्रेच्या दृष्टीने सूचना दिल्या.

यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्वांनी बारकाईने नियोजन करावे, भीमाशंकर येथे गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी येत आहेत, यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी, भीमाशंकर येथे सुरू असलेल्या विकास आराखड्याच्या कामांमुळे यात्राकाळात भाविकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, पिण्याचे पाणी, आरो प्लांट हे देवस्थानने ताब्यात घेऊन त्याची देखरेख करावी, पायरी मार्ग भाविकांसाठी सुरक्षित ठेवावा, अशा सूचना या वेळी वळसे पाटील यांनी केल्या.

या वेळी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश कौदरे, उपाध्यक्ष अ‍ॅड. विकास ढगे पाटील, प्रांताधिकारी सारंग कोडोलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने, कार्यकारी अभियंता आर. वाय. पाटील, उपकार्यकारी विश्वस्त मधुकर गवांदे, रत्नाकर कोडिलकर, दत्तात्रय कौदरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कैलासबुवा काळे, सुभाष मोरमारे, संजय गवारी, प्रकाश घोलप, नंदकुमार सोनावळे, रूपाली जगदाळे, इंदुबाई लोहकरे, भीमाशंकरचे सरपंच दत्तात्रय हिले, सहायक उपवनसंरक्षक अमोल थोरात, वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण, उपअभियंता सुरेश पठाडे, शैलेश गिते आदी उपस्थित होते.

Back to top button