नगर : लाभार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार | पुढारी

नगर : लाभार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार

जामखेड : पुढारी वृत्तसेवा : येत्या दोन दिवसांत घरकुलांचे बांधकाम सुरू झाली नाही, तर घरकुले रद्द होणार आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून लाभार्थ्यांना वेळोवेळी सूचना देऊनही कामे सुरुवात केली नसल्यास त्यांची घरकुले रद्द होणार असल्याचेे गटविकास आधिकारी प्रकाश पोळ यांनी सांगितले. त्यामुळे आता थेट घरकुलांचा हप्ता घेऊनही काम सुरू केले नसलेल्या लाभार्थ्यांवर कारवाईची टांगती तलावर आहे.  प्रधानमंत्री आवास योजना, रमाई/शबरी आवास योजनेतून घरकुल मंजूर आहे. परंतु बांधकाम सुरू केले नाही, अशी सर्व घरकुले रद्द करण्यासाठी जामखेड पंचायत समितीने कारवाई सुरू केल्याचे दिसते.

प्रधानमंत्री आवास योजनेतून तालुक्यात सन 2021-22 या वर्षासाठी 2227 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट होते. यापैकी 2204 लाभार्थ्यांचे घरकुले मंजूर असून, त्यांना पहिल्या हप्त्यापोटी 15 हजार रुपये देण्यात आले आहेत. मात्र, यापैकी 350 लाभार्थ्यांनी पहिला हप्ता देऊन सहा महिने होऊनही अद्यापि घरकुल बांधकाम सुरू केले नाही. तसेच रमाई आवास योजनेतून सन 2021-22 या वर्षासाठी 440 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट होते. यापैकी 421 लाभार्थ्यांची घरकुले मंजूर असून, पहिला हप्ता घेऊनही 150 लाभार्थ्यांनी घरकुलांचे बांधकाम सुरू केले नाही. याबाबत केंद्र व राज्य सरकारकडून स्पष्ट निर्देश प्राप्त झाले असून, ज्या लाभार्थ्यांनी पहिल्या हप्त्याचे 15 हजार रुपये घेऊनही घरकुल बांधकाम सुरू केले नाही. त्यांच्याकडून ते अनुदान वसूल करून त्यांचे घरकुल रद्द करण्याचा सूचना प्राप्त आहेत.

याबाबत प्रशासन कामाला लागले असून, मागील महिनाभरात जामखेड पंचायत समितीने घरकुल मंजुरी, घरकुल सुरू करणे व घरकुल पूर्ण करणे यामध्ये चांगली कामगिरी केली.  परंतु महिनाभर प्रयत्न करूनही, अनेकवेळा भेटूनही काही लाभार्थी प्रशासनाला प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे त्या गावातील पुढील लाभार्थी घरकुलपासून वंचित राहत आहेत. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाच्या सूचना मिळताच जमखेड पंचायत समितीने असे लाभार्थी शोधून त्यांची घरे रद्द करण्याची कारवाई सुरू केली आहे.

अन्यथा घरकुले होणार रद्द : पोळ

सर्व घरकुल योजनांचे मिळून 600 लाभार्थ्यांनी पहिला हप्ता घेऊनही अद्यापि घरकुलांचे बांधकाम केले नाही. ही घरे फेब्रुवारी/मार्च 2021 मध्ये मंजूर करण्यात आली होती. तेव्हापासून या लाभार्थ्यांना 3 नोटिसा देण्यात आल्या. दोन वेळा त्यांना लोक अदालतमध्येही पाचारण करण्यात आले होते. परंतु सदर लाभार्थी कोणताही प्रतिसाद देत नसून 2 दिवसात घरकुल बांधकाम सुरू झाले नाही, तर एकतर्फी कारवाई करून सर्व घरे रद्द करण्यात येणार आहेत. त्यांच्या जागी त्याच गावातील पुढचा क्रमांकाच्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात येईल, असे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी सांगितले.

Back to top button