movie gadad andhar : पाण्याखालचं विश्व दाखवणाऱ्या ‘गडद अंधार’चा रोमांचक टिझर प्रदर्शित | पुढारी

movie gadad andhar : पाण्याखालचं विश्व दाखवणाऱ्या 'गडद अंधार'चा रोमांचक टिझर प्रदर्शित

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाणी आणि मानवी जीवन यांचं नातं अतूट आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अवतार : द वे ऑफ वॅाटर’ या हॅालिवूड चित्रपटात प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे पाण्याखालचं विश्व दाखवण्यात आलं आहे. तंत्रज्ञानाच्या या शर्यतीत मराठी चित्रपटही कुठेच मागे नसल्याचं दर्शवणारा सुपर नॅचरल थ्रीलर ‘गडद अंधार’ हा चित्रपट ३ फेब्रुवारी २०२३ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे.

पाण्याखालचं अद्भुत आणि रहस्यमय विश्व दाखवणारा ‘गडद अंधार’चा टिझर उत्सुकता वाढवणारा आहे. या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार याबाबतचं कुतूहल जागं करणाऱ्या या टिझरला नेटकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सिनेप्रेमींद्वारे ‘गडद अंधार’चा टिझर शेअर करण्यात येत आहे.

इलुला फिचर व्हिजन प्रा. लि.च्या बॅनरखाली निर्माते कॅप्टन अवधेश सिंग आणि वर्षा सिंग यांनी ‘गडद अंधार’ या चित्रपटाची निर्मिती केलीय. दिग्दर्शक प्रज्ञेश रमेश कदम यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘गडद अंधार’ या अनोख्या टायटलमुळे चर्चेत असलेल्या या थ्रिलरपटाचा टिझरही अतिशय रोमांचक आहे.

पाण्यात उडी मारण्यापूर्वी बोटीत असलेला नायक-नायिका, समुद्राच्या तळाशी अंधाऱ्या गुहेत जाण्याचा त्यांचा प्रयत्न, पाण्याखालचं मनमोहक दृश्ये टिपणारा कॅमेऱ्याची जादू ‘गडद अंधार’च्या टिझरमध्ये पहायला मिळते. खऱ्या अर्थाने रोमांचक चित्रपटाची झलक दाखवणारा असा हा टिझर आहे. आजवर कधीही न पाहिलेलं कथानक आणि अलौकीक विश्वावर ‘गडद अंधार’ हा चित्रपट प्रकाशझोत टाकणार आहे. थरार आणि भय यांचा संगम घडवणारा टिझर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.

‘गडद अंधार’ हा चित्रपट मराठी रसिकांना खऱ्या अर्थानं एक वेगळा अनुभव देणारा असल्याचं सांगत दिग्दर्शक प्रज्ञेश कदम म्हणाले की, या चित्रपटाचा टिझर खऱ्या अर्थानं चित्रपटाची झलक दाखवणारा आहे. याद्वारे रसिकांना एका वेगळ्या विश्वात घेऊन जाताना ‘गडद अंधार’च्या टिमला खूप आनंद होत आहे. ‘गडद अंधार’ या टायटलमधील अंधारात प्रेक्षकांना कोणता प्रकाशकिरण दिसणार आणि त्यातून कथानकातील कोणते पैलू उलगडणार हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल. सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांनी या चित्रपटासाठी कठोर परिश्रम घेतले असल्याचंही प्रज्ञेश म्हणाले.

‘एमटीव्ही स्प्लिट्सव्हीला एक्स ३’चा विजेता तसंच ‘बिग बॅास’ फेम जय दुधाणे, नेहा महाजन, शुभांगी तांबाळे, आकाश कुंभार आदी कलाकारांनीही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाचं लेखन प्रज्ञेश कदम, लौकिक आणि चेतन मुळे यांनी केलं असून, पार्श्वगायक व संगीतकार रोहित राऊतनं ‘गडद अंधार’मधील गाण्यांना संगीत दिलंय. प्रवीण वानखेडे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. आदिनाथ पातकर यांनी गाण्याची व्यवस्था केली आहे. सुपर नॅचरल थ्रीलर ‘गडद अंधार’ ३ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

Back to top button