शरद पवारांनी ठाकरेंना आमच्यापासून तोडले, हा खेळ त्यांनीच संपवावा!

शरद पवारांनी ठाकरेंना आमच्यापासून तोडले, हा खेळ त्यांनीच संपवावा!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : महाराष्ट्रात २०१९ मध्ये आम्हाला बहुमत मिळाले होते; पण शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना आमच्यापासून तोडले. ज्यांनी हा खेळ सुरू केला त्यांनीच तो संपवावा, असे सूचक विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.

एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा यांना महाराष्ट्रात २०१९ मध्ये जे झाले, जर घड्याळ उलटे फिरवायचे झाले तर आता तुम्ही वेगळे काय कराल, असा थेट प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अमित शहा म्हणाले की, त्या प्रकरणात आम्ही दोषी नव्हतो. फटका आम्हाला बसला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला बहुमत मिळाले होते; पण शरद पवार यांनी आमचे मित्र – उद्धव ठाकरे यांना आमच्यापासून तोडले. ठाकरे आमचे मित्रच होते. आम्ही सोबत निवडणूक लढवली होती. त्यामुळे ज्यांनी हा खेळ सुरू केला, त्यांनीच तो संपवायला हवा. त्यावेळी त्यांना कोणताही नैतिकतेचा प्रश्न विचारला गेला नव्हता, हे लक्षात घ्या. उद्धव ठाकरे यांना पुन्हा 'एनडीए'मध्ये घ्याल का? या थेट प्रश्नावर शहा म्हणाले की, आमची – महायुती आहे आणि ती व्यवस्थित काम करीत आहे.

भ्रष्टाचाराचे आरोप असणारे नेते भाजपमध्ये आले की, त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जातात, अजित पवारांच्या बाबतीत काय झाले, या प्रश्नावर अमित शहा म्हणाले की, ज्या – प्रकरणांत 'ईडी'ने क्लोजर रिपोर्ट दिला आहे, त्या प्रकरणाचा मी अभ्यास केला आहे. जेव्हा एखादा गुन्हा दाखल होतो, त्यावेळी चार ते पाच गुन्हे असतात. एक भ्रष्टाचाराचा, दुसरा सत्तेच्या गैरवापराचा, तिसरा प्रशासकीय पळवाटांचा आणि चौथा पुराव्यांशी छेडछाड करण्याचा. जेव्हा मुख्य प्रकरणाचे आरोपपत्र येते, तेव्हा त्यात हे सर्व तीन-चार गुन्हे एकसाथ असतात. मुख्य आरोपपत्राबाबत कुणीच बोलत नाहीत, फक्त त्या तीन-चार प्रकरणांबाबतच बोलत असतात.

बहुमत असताना संविधान बदलले नाही

एका प्रश्नाच्या उत्तरात अमित शहा म्हणाले की, संविधान बदलाचा विषय निवडणुकीत केंद्रस्थानी असल्याचे फक्त काही पत्रकार आणि राहुल गांधी यांनाच वाटते. आमच्याकडे दहा वर्षे सत्ता होती, बहुमताचा आकडाही होता. आम्हाला संविधान बदलायचेच असते, तर बदलू शकत होतो; पण आम्ही आमच्या बहुमताचा वापर ३७० कलम हटवण्यात, दहशतवाद निपटून काढण्यात, राम मंदिर उभारणी या कामांत केला.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news