वॉशिंग्टन : अनेकदा कामाच्या गडबडीत अथवा कोणाशी बोलण्याचा मूड नसला तर आपल्याला कॉलवर कोणाशी बोलता येत नाही. पण आता ट्रूकॉलर तुमची ही अडचण सहज सोडवणार आहे. कॉल आला तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने तुमच्या आवाजात समोरच्या व्यक्तीशी हे फीचर संवाद साधणार आहे. समोरच्या व्यक्तीला त्याची जराशी कल्पना पण येणार नाही की तो तुमच्याशी बोलला की या ट्रूकॉलर एआय व्हाईस असिस्टंटशी बोलला! काय आहे हे भन्नाट फीचर? जाणून घ्याःकॉलर आयडी सर्व्हिस ट्रूकॉलर लवकरच लोकांना एआय व्हर्जनची सुविधा देणार आहे. ग्राहक त्यांच्या एआय व्हर्जनमध्ये त्यांचा खरा आवाज जोडतील. त्यामुळे कॉल आल्यावर एआयच्या मदतीने हुबेहूब तुमच्या आवाजात हा एआय व्हाईस असिस्टंट बोलेल.
ट्रूकॉलर बोगस कॉल आणि स्पॅम कॉल यांची ओळख करण्यासाठीचे एक अॅप आहे. नवीन एआय व्हाईस असिस्टंट फीचरसाठी ट्रूकॉलरने Microsoft Azure AI Speech सोबत हात मिळवला आहे. ट्रूकॉलर इस्राईलचे या प्रकल्पाचे संचालक आणि मुख्य व्यवस्थापक राफेल मिमून यांनी एका ब्लॉगमध्ये याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, पर्सनल व्हाईस फीचर युझर्सला त्यांचा आवाज त्यासाठी वापरण्याची परवानगी देतील. त्यानंतर येणार्या कॉलवर डिजिटल असिस्टंट इनकमिंग कॉलवर बोलेल. ही एक मोठी गोष्ट आहे. या फीचरमुळे ग्राहकांना काम करताना एखादा महत्त्वाचा फोन उचलता तर येईलच. पण कॉल रेकॉर्डिंग बटणाचा उपयोग करून त्याला हे संभाषण जतन करता येईल. त्यानंतर वेळप्रसंगी त्यातील मुद्दे टिपता येईल. डिजिटल असिस्टंट दिमतीला आल्याने नकोशा कॉलची कटकट राहणार नाही.
ट्रूकॉलरचे एआय असिस्टंट सर्वात अगोदर 2022 मध्ये दाखल झाले होते. ही सुविधा काही निवडक देशातच मिळते. हे एआय फीचर इनकमिंग कॉल तपासतो आणि त्याची माहिती देतो. युझर्सला वाटले की त्याच्याऐवजी एआय फीचरची मदत घ्यावी. तर तो मदत घेऊ शकतो. सध्या ट्रूकॉलर असिस्टंटचा आवाज उपयोगात येतो. काही दिवसांनी युझर्सला त्याऐवजी त्याचा आवाज वापरता येईल. तुम्हाला 'एआय असिस्टंट' फीचर सुरू करायचे असेल तर त्यासाठी पैसे मोजावे लागतील. ही सेवा मोफत मिळणार नाही. त्यासाठी कंपनीकडून सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल. कंपनी नवीन व्हाईस असिस्टंट फीचरची सुरुवात भारत, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, स्वीडन आणि चिलीमध्ये करणार आहे.