Kanpur Money Heist : कानपूरमध्ये भुयार खोदून स्टेट बँकेतील एक कोटींचे सोने लंपास | पुढारी

Kanpur Money Heist : कानपूरमध्ये भुयार खोदून स्टेट बँकेतील एक कोटींचे सोने लंपास

कानपूर; वृत्तसंस्था : भुयार खणून बँकेत चोरी करण्याचे प्रकार आपण सिनेमात नेहमी बघतो. पण हाच प्रकार कानपूरमध्ये सत्यात अवतरला आहे. चोरट्यांनी तब्बल 10 फूट लांबीचे भुयार खणत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्ट्राँग रूममध्ये प्रवेश केला आणि 1.8 किलो म्हणजे सुमारे एक कोटी रुपयांचे सोने लंपास केले. या घटनेने एकच खळबळ उडाली असून बँक व पोलिस अधिकार्‍यांची झोप उडाली आहे. (Kanpur Money Heist)

कानपूरमधील एसबीआयच्या भानुती शाखेत हा प्रकार घडला. शुक्रवारी सकाळी बँक उघडल्यावर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर सांगितले की, चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्रीनंतर व शुक्रवारी पहाटे या काळात ही धाडसी चोरी केली. बँकेच्या शेजारच्या रिकाम्या प्लॉटवर त्यांनी बँकेच्या दिशेने जाणारे भुयार खणले. बँकेत प्रवेश केला. अलार्म सिस्टीम बंद करत सीसीटीव्ही कॅमेर्‍याची दिशाही बदललेली व गॅस कटरच्या सहाय्याने बँकेचे लॉकर फोडून आतील 1.8 किलो सोने लंपास केले. या सोन्याची किंमत सुमारे एक कोटी रुपये आहे. (Kanpur Money Heist)

पोलिस उपायुक्त विजय धुल यांनी सांगितले की, चोरट्यांनी या चोरीची खूप तयारी केली असावी. जेथे भुयार सुरू होते, तिथे वाळलेली झुडपे, झाडांच्या फांद्या टाकून तेथे खोदकाम झाल्याचा संशय येणार नाही, अशी व्यवस्था केली होती. तसेच बँकेतही त्यांनी ज्या प्रकारे चोरी केली ते पाहता त्यांना बँकेची रचना, लॉकरची जागा, सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या जागा आधीपासूनच माहिती होत्या, असे दिसते. या धाडसी चोरीत बँकेतील कुणी सामील आहे का याचाही तपास केला जात आहे.

अधिक वाचा :

Back to top button