Online Fraud : ऑनलाईन घोटाळ्यातील ४४ लाख काही तासात परत; सायबर पोलिसांची यशस्वी कामगिरी | पुढारी

Online Fraud : ऑनलाईन घोटाळ्यातील ४४ लाख काही तासात परत; सायबर पोलिसांची यशस्वी कामगिरी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सायबर ठगाने ईमेलच्या माध्यमातून एका कंपनीच्या संचालकाला गंडा घालून ४४ लाख लंपास केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. कंपनीच्या संचालकांनी शनिवारी (दि. २४) मुंबई पोलिसांच्या सायबर हेल्पलाईनकडे याची तक्रार केली. सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपींवर कारवाई करत ४४ लाख रुपये परत मिळवण्यात यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीच्या संचालक यांनी शनिवारी (दि. २४) यांनी १९३० या सायबर हेल्पलाईन नंबरशी संपर्क साधून या प्रकरणाची तक्रार केली. तक्रारदार संचालक यांची टेक्सटाईल कंपनी आणि त्यांची व्यावसायिक भागीदार कंपनी यांच्यामधील व्यावसायिक ईमेल संभाषणामधून अनेक आर्थिक व्यवहार होतात. यामधील एका संभाषणा दरम्यान अज्ञात व्यक्तीने बँक खाते नंबरमध्ये अफरातफर केली. त्यानंतर इंटरनेट बँकिंगद्वारे तक्रारदार संचालक यांच्या टेक्सटाईल कंपनीचे ४४ लाख ४३ हजार २७९ रुपये लंपास केले.

त्यानुसार, सायबर हेल्पलाईन कक्षातील पोउनि मंगेश भोर, मपोशि बुरुमकर आणि बाबरे यांनी तात्काळ एनसीआरपी पोर्टलवर तक्रार दाखल करून सबंधित बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर सायबर फसवणूकीची संपूर्ण रक्कम काही तासात कॅनरा बँक खात्यावर होल्ड करण्यात यश आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा

Back to top button