नागपूर : वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे सभागृहाचे कामकाज ५५ मिनिटे खोळंबले | पुढारी

नागपूर : वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे सभागृहाचे कामकाज ५५ मिनिटे खोळंबले

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : विधिमंडळ अधिवेशनाच्या आयोजनासाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात. सर्वच गोष्टींची जय्यत तयारी केली जाते. मात्र, तरीही अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी चक्क विधानसभेचा वीज पुरवठा एकदा, दोनदा नव्हे तर तीनदा खंडीत झाल्याने सभागृहाचे कामकाज सुमारे 55 मिनिटे खोळंबले. विशेष म्हणजे महानिर्मिती पदभरतीत अधिवास प्रमाणपत्र आवश्यक प्रकरणाची लक्षवेधी सुरु होती आणि उपमुख्यमंत्री, राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस बोलायला उभे होते. विरोधकांनी हे कुणाचे कट कारस्थान, सभागृहाचा वीज पुरवठा खंडित, माईक व्यवस्था बंद पडणे हे सरकारचे अपयश असल्याची थेट टीका विरोधी पक्ष नेते अजित पवार, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी या प्रकारावर केली. तर वीज गेल्यामुळे कशी सर्वसामान्यांची अडचण होते, हे आज संपूर्ण सभागृहाला प्रत्यक्ष अनुभवता आले. प्रेस गॅलरी, प्रेक्षक, अधिकारी गॅलरीतही काही काळ वीज गेली होती.

रोहित पवार म्हणाले की, खुद्द ऊर्जामंत्री बोलत असताना कामकाजही बंद पडले. अजित पवार म्हणाले की, विधीमंडळाच्या कामकाजावर कोट्यवधी रुपये खर्च होत असतात. विधीमंडळ सदस्य आपला अमूल्य वेळ कामकाजासाठी देत असतात. राज्यातील जनतेचे लक्ष कामकाजाकडे लागलेले असते. कामकाजातील प्रत्येक मिनिट महत्वाचे असते. विधीमंडळाचा वेळ वाया जावू नये, म्हणून विरोधी पक्ष संपूर्ण सहकार्य करत असताना, ध्वनिक्षेपक यंत्रणा बंद पडल्याने सभागृहाचे कामकाज थांबवावे लागणे योग्य नाही. ज्या यंत्रणेवर ही जबाबदारी आहे ती यंत्रणा आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरली आहे. ध्वनीक्षेपक यंत्रणा वारंवार बंद पडणे आणि त्यामुळे सभागृहाचे कामकाज थांबवावे लागणे, हे सरकारचेही अपयश असून मी या प्रकाराचा निषेध करतो, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली नाराजी आणि संताप व्यक्त केला.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपणही अध्यक्ष राहिला आहात त्यामुळे विधानभवनातील माईक व्यवस्था ही सरकारच्या नव्हे तर अध्यक्षांच्या नियंत्रणात असते असे सांगत नाना पटोले यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि कामकाज पुढे गेले. या गोंधळात सुरुवातीला दहा मिनिटे नंतर पंधरा मिनिटे आणि शेवटी अर्धा तास सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. जाणीपूर्वक माईक बंद करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, 50 खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी पण या काळात पुन्हा एकदा सभागृहात विरोधकांकडून कानी पडली.

अधिक वाचा :

Back to top button