

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने (Messi Record) अर्जेंटिनाला फिफा विश्वचषक जिंकून देत फुटबॉलमधील अनेक विक्रम मोडले. आता मैदानाबाहेरही त्याने विक्रम आपल्या नावे केला आहे. सोमवारी विश्वचषक जिंकल्यानंतर मेस्सीने सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर ट्रॉफीसह एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोला ५२ मिलियन (५ कोटी) पेक्षा अधिक लोकांनी लाईक केले. यामुळे इंस्टाग्राम पोस्टवर सर्वाधिक लाइक्स मिळवणारा तो खेळाडू बनला आहे.
यावेळी मेस्सीने पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विक्रम मोडला. रोनाल्डोने वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी मेस्सीसोबत बुद्धिबळ खेळतानाचा फोटो पोस्ट केला होता. यावर ४२ मिलियन (४ कोटी) पेक्षा जास्त लाईक्स आले होते. त्यानंतर त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला होता. मात्र, मेस्सी त्याच्या पुढे गेला आहे. (Messi Record)
मेस्सीच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, जगाचे चॅम्पियन्स. मेस्सीने या पोस्टमध्ये लिहिले – मी किती वेळा याचे स्वप्न पाहिले होते. माझा विश्वासच बसत नाही… माझ्या कुटुंबाचे, मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे आणि आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार.
आम्ही पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, अर्जेंटिनियन लोक एकत्र आणि एकजुटीने लढतात, तेव्हा आमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. योग्यता या गटाची आहे, जी व्यक्तींच्या वर आहे. हे स्वप्न जे आमचे आणि सर्व अर्जेंटिनीयांचे होते, आम्हाला लढण्याचे बळ दिले. आम्ही ते केले. असे मेस्सीने हे पोस्ट केले.
रविवारी झालेल्या फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मेस्सीने गतविजेत्या फ्रान्सचा पेनल्टीवर ४-२ असा पराभव केला. तत्पूर्वी, पूर्ण वेळेत २-२ आणि अतिरिक्त वेळेत ३-३ अशी बरोबरी होती. अंतिम फेरीत मेस्सीने आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने दोन गोल केले.
या विश्वचषकात मेस्सीने एकूण सात गोल केले. यामुळे विश्वचषकात त्याच्या एकूण गोलांची संख्या १३ झाली. तो अर्जेंटिनासाठी वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडूही ठरला. अंतिम फेरीत मैदानात उतरताच मेस्सीने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. विश्वचषकात सर्वाधिक सामने (२६) करणारा तो खेळाडूही ठरला. मेस्सीचा हा पाचवा विश्वचषक होता.
हेही वाचा;