नाशिक : बिपीन बाफना खून प्रकरणी दोघांना मरेपर्यंत फाशी, अशी केली होती हत्या… | पुढारी

नाशिक : बिपीन बाफना खून प्रकरणी दोघांना मरेपर्यंत फाशी, अशी केली होती हत्या...

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

साडेनऊ वर्षांपूर्वी एक कोटीच्या खंडणीसाठी बिपीन गुलाबचंद बाफना (२२) या तरुणाचे अपहरण करून तब्बल २६ वार करीत निर्घृण हत्या करणाऱ्या दोन्ही दोषींना शुक्रवारी (दि. १६) न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा, तर अपहरणासाठी सात वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून देणारी ही घटना दुर्मीळात दुर्मीळ असल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात न्यायालयाने निकाल दिला आहे.

ओझर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या बिपीनचे जून २०१३ मध्ये अपहरण केले होते. प्रारंभी या प्रकरणात पाच संशयित आरोपींचा सहभाग होता. मात्र, पुराव्यांअभावी तिघांची या प्रकरणातून मुक्तता, तर चेतन यशवंतराव पगारे (२५, रा. ओझर टाउनशिप) व अमन प्रकटसिंग जट (२२, रा. रिव्हर व्ह्यू अपार्टमेंट, केवडीबन, पंचवटी) या दोघांना दोषी ठरविण्यात आले होते. या प्रकरणी गुरुवारी (दि. १५) जिल्हा व सत्र न्यायालयात बचाव व सरकारी पक्षाकडून तब्बल दीड तास युक्तिवाद करण्यात आला होता. सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी जोरदार युक्तिवाद करताना दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षाच ठोठावली जावी, अशी मागणी केली होती. दोघेही सराईत गुन्हेगार असून, ते आता सुधारण्यापलीकडे गेले आहेत. त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षाच देणेच योग्य असल्याचे यावेळी मिसर यांनी म्हटले होते. यावेळी न्यायालयाने निकाल राखून ठेवत शुक्रवारी (दि. १६) दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली आहे.

दरम्यान, दुपारच्या सत्रात न्यायालयात हजर केले, तेव्हा मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. आरोपींना जन्मठेप होणार की फाशी, याबाबत उत्सुकता होती. यावेळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात न्यायालयाच्या आवारात बंदोबस्त ठेवला होता. सत्र न्यायाधीश श्रीमती कदम यांनी निकालाचे वाचन करीत दोन्ही आरोपींना अपहरणाच्या गुन्ह्यात 10 हजार रुपये दंड व सात वर्षांची शिक्षा, तर खुनाच्या गुन्ह्यात प्रत्येकी १ लाखाची नुकसानभरपाई देण्याचे आदेश देताना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी ३५ साक्षीदार तपासण्यात आले, तर संपूर्ण तपास तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त गणेश शिंदे, सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त नरेंद्र पिंगळे, पोलिस कर्मचारी शरद सोनवणे, अजय गरुड यांनी केला आहे.

चेहऱ्यावर पश्चात्ताप नाहीच

आरोपी चेतन पगारे व अमन प्रकटसिंग जट यांना जेव्हा न्यायालयात आणण्यात आले, तेव्हा दोघांच्याही चेहऱ्यावर पश्चात्ताप अथवा भीतीचे भाव दिसून आले नाहीत. चकीत करणारी बाब म्हणजे शिक्षा ठोठावल्यानंतरही दोघे शांतपणे उभे होते. शिक्षेनंतर पोलिस तसेच न्यायालयाला काही बाबींची पूर्तता करायची होती, मात्र दोघांनीही त्याकरिता सहकार्य करण्यास नकारात्मक प्रतिसाद दिला. आपल्या नातेवाइकांशी संवाद साधतानादेखील आरोपी बिनदिक्कत असल्याचे दिसून आले.

मोक्का अंतर्गत गुन्हा

बिपीन बाफना गुन्ह्याचा पोलिसांनी सखोल तपास करून या हत्याकांडातील अमन प्रकटसिंग जट, चेतन यशवंतराव पगारे, अक्षय उर्फ बाल्या सुरज सुळे (२१ रा. जनार्दननगर, नांदूर नाका), संजय रणधीर पवार (२७, रा. महालक्ष्मी चाळ, बागवानपुरा), पम्मी भगवान चौधरी (३२, रा. भारतनगर, वडाळारोड, नाशिक) यांना अटक करून त्यांच्यावर मोक्कांतर्गत गुन्हा दाखल केला होता

अशी केली हत्या

२०१३ साली व्यावसायिक गुलाबचंद बाफना यांचा मुलगा बिपीनचे अपहरण करून त्यांच्याकडे १ कोटींची खडणी मागितली होती. यावेळी गुलाबचंद बाफना यांनी पैसे देण्यास होकारही दिला होता. मात्र, अशातही आरोपींनी बिपीनची २६ वार करीत निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच आरोपींना अटक केली होती. या प्रकरणी एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे गुन्हा सिद्ध झाला.

परिस्थितिजन्य पुराव्यावर हे प्रकरण अवलंबून होते. प्रत्येक धागा जुळवून आणणे गरजेचे होते. तसेच तांत्रिक पुरावा म्हणून एका फोनचा वापर या प्रकरणात करण्यात आला होता. त्याचबरोबर आरोपी आणि मयत यांचे काही व्हिडिओदेखील समोर आले होते. त्यामुळे तांत्रिक पुरावा सिद्ध करून आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवले.

अजय मिसर, विशेष सरकारी वकील

दहावी फाशीची शिक्षा

यावेळी विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी, माझ्या कार्यकाळातील नाशिक न्यायालयामधील ही दहावी फाशीची शिक्षा असल्याचे सांगितले.

हेही वाचा :

Back to top button