

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पोलिस नागरिकांचे मित्र म्हणून काम करतील, त्यासाठी आम्ही पुर्णवेळ कष्ट करू, तसेच जास्ती-जास्त लोकाभिमूख पोलिसिंग कशाप्रकारे राबवता येईल याला प्राधान्य दिले जाईल. मात्र हे करत असताना कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य खपवून घेतले जाणार नाही,त्याची वेळीच गंभीर दखल घेतली जाईल. प्रत्येक पुणेकरांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी आम्ही काम करू अशी ग्वाही नवनियुक्त पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पदभार घेताच दिली.
रितेश कुमार यांनी शुक्रवारी सायंकाळी पुणे पोलिस आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. मावळते पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी रितेश कुमार यांच्याकडे पदभार सुपूर्द केला. पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी फुलांची उधळण करीत त्यांचे स्वागत केले. गृह विभागाकडून 13 डिसेंबर रोजी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये मागील काही दिवसांपासून पुण्याच्या पोलिस आयुक्त पदी कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चा होती.
अखेर राज्य सरकारने रितेश कुमार यांची नियुक्ती केल्यानंतर चर्चेला पूर्णविराम मिळाला. दरम्यान, रितेश कुमार हे सोमवारी पदभार स्वीकारणार होते, मात्र त्यांनी शुक्रवारी सायंकाळी पावणे पाच वाजताच पोलिस आयुक्तालयात पदभार स्वीकारला. सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात आले. उपस्थित पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी फुलांची उधळण करीत त्यांचे स्वागत केले.
यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, रामनाथ पोकळे यांच्यासह सर्व परिमंडळाचे, विभागाचे पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यावेळी उपस्थित होते. रितेश कुमार यांनी उपस्थित वरिष्ठ अधिकार्याशी संवाद साधला.