कोल्हापूर : अधिकार्‍यांकडून शरीरसुखाची मागणी | पुढारी

कोल्हापूर : अधिकार्‍यांकडून शरीरसुखाची मागणी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पन्हाळा पोलिस ठाण्यातील अधिकार्‍याने शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप महिला कॉन्स्टेबलने केल्याने कोल्हापूर पोलिस दलासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तक्रारीची दखल घेत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शुक्रवारी उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त केली. अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई व पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) प्रिया पाटील यांचा त्यात समावेश आहे.

समितीमार्फत दोन्हीही बाजूंकडून सर्वंकष चौकशी होईल. चौकशीत दोषी ठरणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई होईल, असेही पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले. पन्हाळा पोलिस ठाण्यात यापूर्वी कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबलने गुरुवारी (दि. 15) पोलिस अधीक्षक बलकवडे यांची कार्यालयात भेट घेतली. पन्हाळा पोलिस ठाण्यातील अधिकार्‍याने पोलिस ठाण्यातच शरीरसुखाची मागणी केल्याची लेखी तक्रार त्यांनी केली.

शरीरसुखाची मागणी फेटाळल्याने मानसिक त्रास

पन्हाळा पोलिस ठाण्यात चार वर्षे कार्यरत असलेल्या महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत संबंधित अधिकारी विनाकारण लगट करणे, मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने सकाळी हाफ ट्रॅकपँटमध्ये येऊन उलट-सुलट प्रश्न विचारतात. लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीचे त्यांचे वर्तन असते. पोलिस ठाण्यातच शरीरसुखाची केलेली मागणी धुडकावून लावताच संबंधितांनी शारीरिक, मानसिक त्रास दिल्याचाही आरोप पीडित महिलेने केला आहे.

Back to top button