IND W vs AUS W : सुपर ओव्हरमध्ये भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियावर थरारक विजय | पुढारी

IND W vs AUS W : सुपर ओव्हरमध्ये भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियावर थरारक विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रलिया आणि भारतीय महिला संघातील टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने सुपर ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. यामध्ये भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाने महत्वाची कामगिरी बजावली. (IND W vs AUS W)

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतात समोर १८७ धांवाचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना स्मृती मानधना, शेफाली वर्मा, कर्णधार हरप्रीत कौर आणि अखेरच्या षटकात फलंदाजी करणाऱ्या रिचा घोष आणि देविका विद्या यांच्या झुजांर खेळीच्या बळावर निर्धारित षटकात सामना बरोबरीत राखण्यात भारताला यश आले आणि हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

सुपर ओव्हरमध्ये पुन्हा रिचा घोष आणि स्मृती मानधना यांच्या फटकेबाजीमुळे भारताने ऑस्ट्रेलिया समोर २१ धावांचे लक्ष ठेवले. अलिसा हेली हिच्या फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया केवळ १६ धावांपर्यंत पोहचू शकला आणि या थरारक सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली.

ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्मृती मानधना आणि शेफाली वर्माने धडाकेबाज फलंदाजी केली. दोघींनी मिळून पहिल्या पावरप्लेमध्ये ५५ धावा केल्या. नवव्या षटकात शेफाली २३ चेंडूत ३४ धावा करुन बाद झाली. तिच्या नंतर आलेली जेमिमा रॉड्रिक्स ही केवळ ४ धावांवर बाद झाली. यानंतर स्मृतीची साथ देण्यासाठी कर्णधार हरमनप्रीत कौर मैदानात उतरली. दोघींनी ऑस्ट्रेलियन संघाची चांगली धुलाई केली. १६ व्या षटकात हरमनप्रीत २१ धावांवर बाद झाली.

पुढील षटकात स्मती मानधना बाद झाली. संपूर्ण सामन्यात स्मृतीने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले. तिने मैदानाच्या सर्व दिशेला फटकेबाजी केली. या फटकेबाजीच्या जोरावर तिने ४९ चेंडूत ७९ धावांची खेळी केली. यात तिने ९ चौकार आणि ४ षटकारांची आतषबाजी केली. पण अगदी शेवटी गरज असताना स्मृती बाद झाली. यानंतर दीप्ती शर्मा २ धावांवर बाद झाली. पॉवर हिटर रिषा घोष आणि देविका विद्या यांनी अखेरच्या षटकात फटकेबाजी करत अत्यंत अटीतटीच्या प्रसंगी सामना बरोबरीत सोडविण्यात यश मिळवले. रिचाने १३ चेंडूत २६ धावा तर देविकाने ५ चेंडूत ११ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया कडून पदार्पण करणाऱ्या हैदर ग्रॅहमने तीन बळी मिळवले तर अलाना किंग आणि ॲनाबेल सदरलँडने १ -१ बळी मिळवले.

सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला. फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या बेथ मोनी आणि ताहलिया मॅकग्रा यांनी शानदार फलंदाजी करत संघाला १८७ धावा केल्या. ऑस्ट्रलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. ऑस्ट्रेलियाने केवळ १ विकेट गमावून १८७ धावांचा डोंगर रचला. ऑस्ट्रेलियाकडून हेलीने १५ चेंडू २५, मोनीने ५४ चेंडूत ८२ तर ताहिला मॅकग्राने ५१ चेंडूत ७० धावा केल्या. भारताकडून केवळ दीप्ती शर्माला हेलीच्या रुपात एकमेव बळी मिळवता आला.

सुपर ओव्हरचा थरार

ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाला बरोबरीत सोडवून भारताने हा सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. भारताकडू रिचा घोष आणि स्मृती मानधना मैदानात उतरल्या. ऑस्ट्रेलियाने हैदर ग्रॅहम या पदार्पण करणाऱ्या खेळाडूकडे चेंडू सोपवला. पहिल्या चेंडूवर रिचा घोषने षटकार ठोकला. दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात रिचा झेल देऊन बाद झाली. यानंतर हरमनप्रीत कौर मैदानात उतरली. तिसऱ्या चेंडूवर कौरने एक धाव घेतली. चौथ्या चेंडूवर स्मृतीने चौकार मारला. पाचव्या चेंडूवर पुन्हा स्मृतीने षटकार ठोकला. अखेरच्या सहाव्या चेंडूवर स्मृतीने मोठा फटका खेळला पण, क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूने चौकार जाण्यापासून वाचवला. पण, भारताच्या फलंदाजांनी तीन धावा घेत सुपर ओव्हर मध्ये २० धावा करत ऑस्ट्रेलिया समोर २१ धावांचे आव्हान ठेवले.

ऑस्ट्रेलियाकडून सुपर ओव्हरमध्ये ग्रॅडर आणि हेली मैदानात उतरल्या. भारताने अनुभवी रेणुका सिंगकडे गोलंदाजी सोपवली. रेणुकाच्या पहिल्या चेंडूवर हेलीने चौकार मारला. दुसऱ्या चेंडूवर हेलीने १ धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर ग्रॅडरने लॉग ऑफला अगदी सीमा रेषेवर झेल दिला. राधा यादवने तो झेल घेतला. चौथ्या चेंडूवर मॅकग्राने १ धावा घेतली. पाचव्या चेंडूवर हेलीने चौकार आणि साहव्या चेंडूवर षटकार ठोकला. पण, तोपर्यंत फार वेळ झाला होता, कारण ऑस्ट्रेलियाने केवळ १६ धावा करु शकला.

हेही वाचा;

Back to top button