Mumbai : विक्रोळीत अवैध क्लिनिक चालविणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अवैध क्लिनिक चालविणाऱ्या डॉक्टरवर विक्रोळी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची घटना उघडकीस आली आहे. महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद, मुंबई येथील रजिस्ट्रार यांच्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्रोळीच्या पुर्वेकडील टागोरनगरमध्ये एक डॉक्टर अवैधरित्या पेन केअर सेंटर चालवत असल्याची तक्रार गेल्यावर्षीच्या जून महिन्यात विक्रोळी पोलिसांकडे करण्यात आली होती. क्लिनिक चालविणाऱ्या डॉक्टरचे प्रमाणपत्र वैध की अवैध आहे, याची माहिती विक्रोळी पोलिसांनी महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद, मुंबई यांच्याकडे मागितली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणाची छाननी सुरु केली. आरोप असलेल्या डॉक्टरने दिल्ली कौन्सिल, फिजियोथेरपिस्ट येथे नोंदणी केली असून या डॉक्टरने महाराष्ट्रात कोणतीही नोंदणी केली नसल्याचे उघड झाले.
कायद्यानुसार महाराष्ट्रात नोंदणी केल्याशिवाय वैद्यकीय व्यवसाय करता येत नाही. मात्र हे डॉक्टर विक्रोळीत व्यवसाय करत होते. अखेर तक्रारदारांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात संबंधीत डॉक्टर विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार डॉक्टर विरोधात महाराष्ट्र राज्य परिषद ऑक्युपेशनल थेरपी आणि फिजिओथेरपी कायद्याच्या कलम ३२ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा