डॉ. रोशन जवाद अहमद शेख : रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावूनही बनली एमडी डॉक्टर | पुढारी

डॉ. रोशन जवाद अहमद शेख : रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावूनही बनली एमडी डॉक्टर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: वडील भाजी विक्रते, उपजीविका चालण्याइतपतही पैसे मिळतील की नाही अशी परिस्थिती. त्यात रेल्वे अपघातात आपले दोन्ही पाय देखील गमावले. परंतु, आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द मात्र कायम ठेवली. इतरांसाठी संपलेले आयुष्य केवळ जिद्दीच्या जोरावर पूर्ण करून डॉ. रोशन जवाद अहमद शेख या मुलीने केईएम रुग्णालयातून एमडीचे शिक्षण पूर्ण केले.

जोगेश्वरीच्या चाळीत भाड्याच्या घरात राहणाऱ्या डॉ. रोशन जवाद अहमद शेख हिचे प्राथमिक शिक्षण फारुख हायस्कूलमध्ये झाले. तिने पहिलीपासून ते दहावीपर्यंत वर्गात प्रथम क्रमांक पटकावला. दहावीला तिने ९२.१५ टक्के गुण मिळवत जोगेश्वरीमध्ये सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला.

अपघातात दोन्ही पाय गमवावे लागले

७ ऑक्टोबर २००८ रोजी महाविद्यालयाची ११ वीच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा देऊन घरी परतत असताना अंधेरी-जोगेश्वरी दरम्यान गर्दीमुळे धावत्या लोकलमधून ती खाली पडली. अपघातानंतर तिच्या आई-वडिलांच्या तिला धीर दिला. यात तिला दोन्ही पाय गमवावे लागले.

माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यामुळे तिला कृत्रिम पाय मिळाले. आणि याच कृत्रिम पायांच्या आधारे तिने पुन्हा नव्याने जीवनाला सुरुवात केली. वडील आजारी असल्याने तिची आई तिला दररोज महाविद्यालयात घेऊन जात होती. महाविद्यालयातील शिक्षकांचा ही तिला चांगला पाठिंबा व मार्गदर्शन मिळाले. रोशनने १२ वीमध्ये ७५.१७ टक्के मिळवत उज्वल यश मिळवले. त्याच विश्वासाच्या जोरावर तिने पुढील उच्च शिक्षण पूर्ण केले.

मेडिकल बोर्डाचा आदेश फेटाळून लावत एमबीबीएसला प्रवेश

अपघातात आपले दोन्ही पाय गमावल्याने तिला एमबीबीएसला प्रवेशापूर्वीच अपात्र ठरविले. रोशनने त्याविरोधात २०११ मध्ये उच्च न्यायालयात याचिका करून दाद मागितली होती. उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्या. मोहित शहा यांनी याप्रकरणाची दखल घेऊन तातडीने सुनावणी घेण्याचे ठरविले.

या याचिकेची न्या. मोहित शहा आणि न्या. गिरीश गोडबोले यांच्या खंडपीठाचे सुनावणी झाली असता, त्यांनी तिची पुन्हा अपंगत्व चाचणी घेण्याचे मेडिकल बोर्डाला आदेश दिले. त्यानंतरही पुन्हा तिला मेडिकल बोर्डाने अपात्र ठरविल्याने मुख्य न्यायमूर्तींनी न्यायालयात हजर असलेल्या रोशनला न्यायालयातील रॅमवर चालण्यास सांगितले.

या दरम्यान तिने न अडथळता चालून दाखविले. ते पाहून न्या. शहा यांनी मेडिकल बोर्डाचा आदेश फेटाळून लावत तिला एमबीबीएसला प्रवेश देण्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाला आदेश दिले होते. त्यानंतर रोशनला जीएस मेडिकलमध्ये (केईएम हॉस्पिटल) प्रवेश मिळाला. दरवर्षी तिने प्रथम वर्गात उत्तीर्ण होऊन २०१६ मध्ये एमबीबीएसची पदवी प्रथम वर्गात मिळविली.

त्यानंतर केवळ एमबीबीएस डॉक्टर म्हणून न राहता एमडी डॉक्टर होण्याच्या जिद्दीवर तिने केईएम रुग्णालयात प्रवेश घेतला. यानंतर तिने पॅथॉलॉगी विभागातून एमडीचे शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले.

आता तिला दोन वर्षे बॉण्ड सर्व्हिस पूर्ण करायची आहे. त्यानंतर यशस्वी डॉक्टर होऊन लोकांची सेवा करायची आहेत. तसेच समाजातील गरीब-गरजू आणि अपंग लोकांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा निर्धार तिने केला आहे. याशिवाय एमबीबीस मेडिकल सीईटीतही ती अपंगांच्या कोट्यातून तिसरी आली होती.

मोलाची ठरली ही मदत

काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी तिच्या एमबीबीएस ते एमडीपर्यंतचा सर्व खर्च केला. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अपघातानंतर कृत्रिम पाय बसविण्यासाठी तिला मदत केली.

हेही वाचलंत का? 

रोशन प्रचंड कष्टाळू आणि मेहनती आहे. केवळ आणि केवळ जिद्दीच्या जोरावर तिने मिळालेल्या संधीच सोन केलं आहे. इतरांनी देखील अडचणी सांगण्यापेक्षा अडचणींवर मात करायला शिकावे. त्यासाठी रोशनकडून प्रेरणा घ्यावी.
-डॉ. प्रवीण बांगर (केईएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक)

Back to top button