केदा आहेरांच्या कार्यकर्त्यांच्या मनसुब्यांवर पाणी, उमेदवारीची अपेक्षा फोल | पुढारी

केदा आहेरांच्या कार्यकर्त्यांच्या मनसुब्यांवर पाणी, उमेदवारीची अपेक्षा फोल

देवळा ; नाशिक लोकसभेची जागा भाजपला सुटेल व भाजपा नेते केदा आहेर यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा आहेर व त्यांचे कार्यकर्ते बाळगून होते. परंतू तेथे शिंदे गटाला उमेदवारी देण्यात आल्याने त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमधे मोठा असंतोष निर्माण झाला आहे. समर्थक कार्यकर्त्यांच्या नाराजीचा थेट फटका नाशिक, दिंडोरी सह धुळे लोकसभेतही काही अंशी बसू शकतो.

गेल्या चाळीस वर्षांपासून केदा आहेर हे भाजपात सक्रिय आहेत. स्वर्गिय माजी आरोग्य मंत्री डॉ.डी.एस आहेर यांच्या सोबत संघटनेचे काम करत असतांना जिल्हाभरात त्यांनी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे तयार केलेले आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत असतांना त्या माध्यमातून मोठा जनसंपर्क त्यांनी तयार केला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची यशस्वी कारकीर्द राहिली आहे.

माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या निवडणूकीत देखील सक्रिय सहभागी होऊन मोठे मताधिक्य मिळवून दिले.
खा.डॉ भारती पवार यांना पक्षात आणून त्यांना उमेदवारी मिळवून देण्यापासून ते त्यांना निवडून आणण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. चांदवड देवळा मतदारसंघातून सर्वाधिक ८० हजारांच्या वर मताधिक्य त्यांनी मिळवून दिले होते.

तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, बाजार समिती या निवडणुकांत देखिल पक्षाची मदत न घेता स्वतःच्या ताकदीवर विजयश्री खेचून आणण्यासाठी आहेर यांची नेहमीच महत्वाची भूमिका राहिली आहे. २०१४ मध्ये केदा आहेरांनी विधानसभा लढवावी असा जनतेचा मोठा रेटा होता. परंतू स्वर्गिय डॉ. दौलतराव आहेर यांच्या शब्दाला मान देऊन स्वतःच्या व जनतेच्या इच्छेला मुरड घालून चांदवड देवळा विधानसभा मतदार संघात कमळ फुलवत आमदार डॉ. राहुल आहेरांना निवडून आणण्यासाठी त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे.

असे असताना केदा आहेर यांना पक्षाकडून नाशिक लोकसभेची उमेदवारी मिळेल ही आशा समर्थक कार्यकर्त्यांची होती. वाटाघाटीत ही जागा शिंदे गटाला गेल्याने कार्यकर्त्यांचा चांगलाच भ्रमनिरास झाला. कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. यामुळे आता केदा नाना आहेर काय भूमिका घेणार, याकडे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा –

Back to top button