मुंबई, पुढारी ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबद येथील कार्यक्रमात भाजप नेत्यांचा उल्लेख भावी सहकारी असा केला, त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क मांडले जात आहेत. अशात व्यासपीठावर उपस्थित असणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही सूचक विधान केले. त्यावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना विचारण्यात आलं, त्यांनी रावसाहेब दानवेंना टोला लगावला आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, "चांगली गोष्ट आहे की, राजकारणात विरोधी पक्ष आपले दुश्मन नसतात. वैचारिक मतभेद असू शकतात. पण, दुश्मन नाही. कदाचित रावसाहेब दानवे यांनाच शिवसेनेत यायचं असेल तर?", असाही टोमणा भुजबळांनी (Chhagan Bhujbal) रावसाहेब दानवेंना लगावला.
उद्धव ठाकरेंनी भावी सहकारी म्हंटल्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या त्रासामुळे मुख्यमंत्र्यांनी असं विधान केलं असेल, असं विधान केलं. त्याचा समाचार घेतना भुजबळ म्हणाले की, "फडणवीसांच्या विधानाशी मी सहमत नाही. कारण काँग्रेस-राष्ट्रवादीचा काहीही त्रास मुख्यमंत्र्यांना नाही. उलट मागील पाच वर्ष भाजपाने शिवसेनेला कशी वागणूक दिली हे सगळ्यांनी पाहिलं आहे. त्यावर काही बोलण्याची मला गरज वाटत नाही. केंद्र सरकारमध्ये शिवसेनेला दिलेलं मंत्रीपद आणि केलेली अवहेलना देखील आपण पाहिली आहे", असं मत भुजबळ यांनी मांडलं.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे काय म्हणाले?
रावसाहेब दानवे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना काॅंग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केलेल्या अनुभवावरून असं विधान केलं असावं. इतकंच नाही, काॅंग्रेसचे नेते खूप त्रास देतात. आपण एकदा बसून ूबोलू, असंही मुख्यमंत्री कानात म्हणाले", असाही दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानानंतर आगामी काळात शिवसेना आणि भाजपची युती झाली, तर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे चालतील का, या प्रश्नाला उत्तर देताना दानवे म्हणाले की, "आधी सगळं जमून येऊ देत. मग, पुढे चर्चा होत राहतील. शिवसेना आणि भाजप पूर्वमित्र होते. त्यामुळे आता पुन्हा मित्र होण्याची शक्यता आहे", असंही रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.
"शिवसेना हा आमचा समविचारी पक्ष आहे, त्यामुळे शिवसेनेनं युतीचा विचार केला तर निश्चितच भाजप त्याचं स्वागत करेल", असं सूचक विधान भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.
पहा व्हिडीओ : धनंजय महाडिक यांच्या घरचा गणेशोत्सव