औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : भाजपचे प्रादेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दूहू येथील एका कार्यक्रमात मला माजी मंत्री म्हणू नका. दोन तीन दिवसांत तुम्हाला याचे करण कळेल, असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. मात्र त्यांच्या या वक्तव्यावर शुक्रवारी (दि. १७) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपल्या शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले माझ्या कानावर असे आले की, चंद्रकांत पाटील हे महाविकास आघाडीतील तीन पैकी एका पक्षात प्रवेशाच्या प्रयत्नात आहेत. कदाचित त्यामुळेच त्यांनी असे वक्तव्य केले असावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी पहिल्यांदाच दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोर (डीएमआयसी) या प्रकल्पातील हायटेक ऑरिक सिटीला भेट दिली. संपूर्ण इमारतीची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी पत्रकारांनी त्यांना चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याविषयी विचारणा केली असता ते म्हणाले की, राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. माझ्या कानावर असे आले की, पाटील हे या तिन्ही पक्षांपैकी एकात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत आणि त्यामुळेच त्यांनी असे वक्तव्य केले असावे, असा टोला लगावत त्यांनी पाटील यांच्या वक्तव्याला उत्तर दिले.
दरम्यान, यावेळी मराठवाड्याचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगत ठाकरे पुढे म्हणाले की, आज मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यासाठी निधीही उपलब्ध केला असून हे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ऑरिक प्रकल्पाच्या भेटीबाबत ते म्हणाले की, दोन-चार दिवसांपूर्वीच निती आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत जी बैठक झाली. त्यात ऑरिकच्या या इमारतीचे फार कौतुक झाले. त्यामुळे या प्रकल्पाला भेट देण्याची इच्छा होती. तसेच पंचतारांकित हॉटेल सर्वांना माहिती आहे. परंतु पंचतारांकीत औद्योगिक वसाहत कशी असते. तेही पाहायचे होते. त्यामुळेच या प्रकल्पाची पाहणी केली. खरोखरच ही औद्योगिक वसाहत अद्ययावत असून येथे नव्या मोठ्या गुंतवणुकी याव्यात, यासाठी ऑरिक इमारतीची जगभरात प्रसिद्धी होणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
तसेच जेजे प्रकल्प जनतेच्या हिताचे आहेत. मग बुलेट ट्रेन असो, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग असो, त्यातून शिर्डी-औरंगाबाद मार्ग असो, नगर-औरंगाबाद रेल्वे मार्ग असो. त्यासाठी राज्य सरकारला जर त्यांच्या वाटा द्यायचा असेल. तर ते निश्चित देण्यात येईल. यात माघार घेणार नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या नव्या इमारत बांधकामाच्या भूमीपुजनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच व्यासपीठावरील आजी-माजी सहकारी आणि पुढे एकत्र आल्यास भावी सहकारी असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. त्यांचे हे वक्तव्य आणि गुरुवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केलेले वक्तव्य यावरून शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येते काय, अशा चर्चेला सुरूवात झाली होती.
परंतु यावर लागलीच अर्ध्या तासांत मुख्यमंत्री ठाकरे यांनीच खुलासा केला. ते म्हणाले की, अलिकडे राजकारणाला अतिशय विकृत स्वरूप येताना दिसत आहे. हे प्रकार थांबले पाहिजेत. यामुळे विकास कामांतही अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळेच शुक्रवारी जिल्हा परिषदच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या भूमीपूजना प्रसंगी व्यासपीठावरील आजी-माजी सहकारी आणि एकत्र आले तर भावी सहकारी, असा उल्लेख केला. असे म्हणण्या मागचे कारण हे एवढेच की, विकास कामांसाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. केंद्रात भाजपची सत्ता आणि राज्यात आमच्या महाविकास आघाडीची. त्यामुळे दोघेही सोबत राहिलो तर विकास कामे यशस्वीरित्या पूर्ण होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.