‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन’च्या उपाध्यक्षपदी राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती | पुढारी

‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन’च्या उपाध्यक्षपदी राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : नीती आयोगाच्या धोरणाशी सुसंगत मात्र राज्याच्या गरजांची दखल घेत खाजगी क्षेत्र व अशासकीय संस्थाच्या सहभागाद्वारे राज्याचा जलद व सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेची स्थापना करण्यास राज्य शासनाने केली आहे. आज, गुरुवारी (दि.१) “मित्र” संस्थेच्या संघटनात्मक रचनेमध्ये नियामक मंडळात उपाध्यक्षपदी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली.

भारत सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन २०४७ पर्यंत “विकसित भारत- भारत@२०४७(India@2047)” करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. विकसित भारताची ही उद्दिष्टे साध्य करीत असताना भारतातील राज्यांना सुद्धा सन २०४७ पर्यंत संपूर्णपणे विकसित होणे गरजेचे आहे. या दृष्टीने महाराष्ट्रची अर्थव्यवस्था सन २०२७ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर व सन २०४७ पर्यंत ३.५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचविणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे. याच पाश्वभूमीवर नीति आयोगाच्या धर्तीवर राज्यामध्येही अशा संस्थेची स्थापना करण्याबाबतच्या सूचना नीति आयोगाकडून देण्यात होती. त्यानुसार नीती आयोगाच्या धोरणाशी सुसंगत मात्र राज्याच्या गरजांची दखल घेत खाजगी क्षेत्र व अशासकीय संस्थाच्या सहभागाद्वारे राज्याचा जलद व सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेची स्थापना करण्यास शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आली.

“मित्र” संस्थेच्या संघटनात्मक रचनेमध्ये नियामक मंडळात अध्यक्षपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहअध्यक्षपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी पदरचना यापूर्वी करण्यात आली आहे. आज शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने “मित्र” संस्थेच्या संघटनात्मक रचनेमध्ये नियामक मंडळाच्या उपाध्यक्षपदी राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली.

राजेश क्षीरसागर हे सध्या कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ, महाराष्ट्र राज्य (कॅबिनेट मंत्री दर्जा) या पदावर दि.१९ जून २०१९ रोजी पासून कार्यरत आहेत. या पदावर कार्यरत असताना त्यांनी महाराष्ट्राचा दौरा करत विभागीय स्तरावर नियोजन मंडळाच्या बैठका घेतल्या. या माध्यमातून त्यांचा लोकोपयोगी विकासकामे व जिल्हा नियोजन समितीचा कारभार सुधारण्यावर त्यांचा भर राहिला. त्यांच्या कामाची दखल त्यांच्याकडे या कामासोबत नवी जबाबदारी शासनाने सोपवली आहे.

या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, राज्याचा विकास साधण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेची स्थापना करताना त्यातील मूळ उद्देश साध्य करण्याची मोठी जबाबदारी आहे. या संस्थेच्या माद्यमातून अभ्यासपूर्वक काम करून राज्याच्या जलद व सर्वसमावेशक विकासाचा भाग होणे ही माझ्यासाठी मोठी संधी असणार आहे. नियोजन विभागाच्या कामकाजाशी संलग्न अशी मित्र या संस्थेची कार्यपद्धती असल्याने मित्र या संस्थेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने मला माझी कार्यक्षमता सिद्ध करण्याची एक सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.

यावेळी राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले, नियोजन विभागातील कार्यपद्धतीच्या अनुभवावर ही जबाबदारी निभावणे मला सोयीस्कर होणार आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकरी अध्यक्षपदी काम करताना राज्याच्या विकासाला चालना देण्यास उपाययोजीलेल्या उपक्रमांची दखल घेवून या पदावर आपली नियुक्ती झाली असून, या नियुक्तीबद्दल या संस्थेचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सहअध्यक्षपदी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार व्यक्त करतो. मित्र संस्थेच्या झालेल्या नियुक्तीच्या माध्यमातून राज्याचा विकास साध्य करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचा, विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा :

Back to top button