Misfiring Messi : मेस्सीच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद! | पुढारी

Misfiring Messi : मेस्सीच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद!

पुढारी ऑनलाईन डेस्क : फिफा विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटीना संघाने शेवटच्या साखळी सामन्यात पोलंडवर 2-0 ने विजय मिळवला. पण या सामन्यात मेस्सी पेनल्टीवर गोल करण्यात अपयशी ठरला. याचबरोबर पाचवा विश्वचषक खेळणा-या या स्टार खेळाडूच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात दोन पेनल्टीवर गोल करू न शकणारा मेस्सी हा जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने विश्वचषकात तीनपैकी दोन पेनल्टी किक गमावल्या आहेत. (Misfiring Messi Argentina legend player penalty miss against Poland)

बुधवारी रात्री उशीरा झालेल्या सामन्यात मेस्सीच्या अर्जेंटीना संघाने दुस-या हाफमध्ये मॅक अॅलिस्टर आणि ज्युलियन अल्वारेझ यांनी केलेल्या गोलच्या जोरावर विजय मिळवला. सौदी अरेबियाविरुद्ध पहिला सामना 1-2 गोलफरकाने गमावल्यानंतर, अर्जेंटीनाने शेवटचे दोन साखळी सामने जिंकून सहा गुणांसह ‘ग्रुप सी’मध्ये अव्वल स्थान पटकावले. मात्र, या सामन्यात मेस्सीने चाहत्यांची निराशा केली. तो पहिल्या हाफच्या 41 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनाल्टीवर गोल करण्यात अयशस्वी ठरला आणि त्याच्या नावावर नकोशा विक्रम नोंदवला गेला. एकप्रकारे पोलंडच्या गोलकीपरने जबरदस्त सेव्ह केल्याचा फटका मेस्सीला बसला आहे. यापूर्वी रशियात झालेल्या 2018 च्या वर्ल्ड कपमध्ये आईसलँडविरुद्धच्या सामन्यात मेस्सीला पेनल्टीवर गोल करता आला नव्हता. तो सामना 1-1 बरोबरीत सुटला होता. (Misfiring Messi Argentina legend player penalty miss against Poland)

दरम्यान, मेस्सीच्या आधी असा विक्रम घानाच्या असमोह जियानच्या नावावर नोंदवला गेला आहे. जियान हा मेस्सीच्या आधी फिफा विश्वचषक स्पर्धेत चार पैकी दोन पेनल्टीवर गोल करू न शकणारा खेळाडू आहे. 2006 साली जर्मनीतील आणि 2010 मध्ये द. आफ्रिकेतील वर्ल्ड कप स्पर्धेत तो पेनल्टीचे रुपांतर गोलमध्ये करू शकला नाही. 2010 च्या स्पर्धेत घानाने क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली होती. त्या फेरीत त्यांचा सामना उरुग्वेशी झाला. निर्धारीत वेळ संपून सामना अतिरिक्त वेळेत गेला. उरुग्वेच्या सुआरेझने डी-मध्ये हँडबॉल केल्याने रेफरींनी घानाला पेनल्टी बहाल केली. त्याच बरोबर सुआरेझला रेड कार्ड दाखवले. घानाला विजया संधी चालून आली होती. मात्र 122 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी किक मारून जियानने चेंडू गोलपोस्टच्या पोलवर मारला. त्याची ही चूक संघाला खूप महागात पडली. अखेर सामना 1-1 बरोबरीत सुटला. त्यानंतर पेनल्टीशुटआऊटमध्ये उरुग्वेने घानाचा 4-2 ने पराभव करत सेमीफायनल गाठली. ही चूक घडण्याआधी जियानने 2006 च्या जर्मनीतील वर्ल्ड कप स्पर्धेत चेक प्रजासत्ताक विरुद्धच्या सामन्यात पेनल्टी किक वर गोल करण्याची संधी हुकवली होती. पण तो सामना घानाने 2-0 गोलफरकाने जिंकला होता. त्या सामन्यात जियाने दुस-याच मिनिटाला गोल केला होता. (Misfiring Messi Argentina legend player penalty miss against Poland)

 

Back to top button