अँटिबायोटिक्सचा करा योग्य वापर, Antibiotic resistance बद्दल जाणून घ्या | पुढारी

अँटिबायोटिक्सचा करा योग्य वापर, Antibiotic resistance बद्दल जाणून घ्या

अँटिबायोटिक्सच्या अती तसेच अनावश्यक वापरामुळे अँटिबायोटिक्स विरोधात सूक्ष्म जंतूंमध्ये जी प्रतिकारक शक्ती निर्माण झाली आणि त्यामुळे अँटिबायोटिक्सची परिणामकारकता कमी झाली, त्यालाच अँटिबायोटिक रेझिस्टन्स असे म्हणतात.

आज जगभर अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स ( Antibiotic resistance) ही एक महत्त्वाची समस्या मानली जात आहे. जी औषधे जंतुसंसर्ग झाल्यावर वैद्यकीय सल्ल्यातून घेतली जातात, त्याला प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) असे म्हणतात. अँटिबायोटिक्स प्रामुख्याने जीवाणूजन्य आजारांवर प्रभावी असतात. अँटिमायक्रोबियल ही संज्ञा सर्वसाधारणपणे जीवाणूरोधक, विषाणूरोधक, बुरशीरोधक, परजीवीरोधक अशा सर्व प्रकारांतील औषधांसाठी वापरली जाते.

आज जगभर अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स (Antimicrobial Resistance) ही एक महत्त्वाची समस्या मानली जात आहे. जी औषधे जंतुसंसर्ग झाल्यावर वैद्यकीय सल्ल्यातून घेतली जातात, त्याला प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) असे म्हणतात. अँटिबायोटिक्स प्रामुख्याने जीवाणूजन्य आजारांवर प्रभावी असतात. अँटिमायक्रोबियल ही संज्ञा सर्वसाधारणपणे जीवाणूरोधक, विषाणूरोधक, बुरशीरोधक, परजीवीरोधक अशा सर्व प्रकारांतील औषधांसाठी वापरली जाते.

Antibiotic resistance म्ह‍णजे काय ?

जागतिक आरोग्य संघटनेचे असे अनुमान की, जर प्रतिजैविकांच्या अयोग्य वापरावर निर्बंध घातले नाहीत, तर पुढील काही वर्षांत बॅक्टेरियल संसर्गाने झालेल्या रोगांना आटोक्यात आणणे खूप अवघड होईल. अलेक्झांडर फ्लेमिंगने 1928 मध्ये पहिल्या अँटिबायोटिक्स म्हणजेच पेनिसिलीनचा शोध लावला. 1932 मध्ये जर्मनीत सल्फाचा शोध लागला व जादू झाल्याप्रमाणे जीवाणूमुळे होणारे रोग आपल्या आवाक्यात आले. त्यानंतर नवनवीन अँटिबायोटिकचा शोध लागत गेला व त्यामुळे मानव जातीला सूक्ष्म जंतूंमुळे होणार्‍या रोगांपासून मुक्ती मिळाली. उदा. कॉलरा, टायफॉईड, टीबी इत्यादी. परंतु, नंतरच्या कालावधीत अँटिबायोटिक्सच्या अती तसेच अनावश्यक वापरामुळे अँटिबायोटिक्सविरोधात सूक्ष्म जंतूंमध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण झाली आणि अँटिबायोटिक्सची परिणामकारकता कमी कमी झाली, त्याला अँटिबायोटिक रेझिस्टन्स असे म्हणतात. नंतर हळूहळू करत एकेक अँटिबायोटिक्सला रेझिस्टन्स येऊ लागला. त्यामुळे त्याचा प्रभाव कमी होत गेला. उदा. पूर्वी टायफॉईडसाठी सिप्रॉफ्लॉक्सासीनचा चांगला परिणाम होत होता. परंतु, आता टायफॉईडसाठी सिप्रॉफ्लॉक्सासीन प्रभावी पडत नाही.

जेव्हा एखाद्या पेशंटला अँटिबायोटिक्स देतो, तेव्हा संसर्ग होणारे जंतू मारले जातात. परंतु, ज्यावेळी अँटिबायोटिकचा सारखासारखा जंतूंवर मारा होतो, त्यावेळी त्या जंतूमध्ये असे बदल घडतात की तो जंतू त्या अँटिबायोटिकला दादच देत नाही. असे अँटिबायोटिक रेझिस्टन्ट बॅक्टेरिया शरीरात तयार होतात. त्यांची संख्या वाढते व ते इन्फेक्शन अँटिबायोटिक्सना प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे पेशंटचा आजार म्हणजे जंतूसंसर्ग बळावू शकतो आणि पेशंटच्या जीवाला धोका होऊ शकतो.

एकदा अँटिबायोटिक रेझिस्टन्ट बॅक्टेरिया तयार झाला की, मग तो वेगवेगळ्या मार्गांनी इतर पेशंटमध्ये प्रवेश करतो व त्याचा प्रसार होतो. उदा. ऑपरेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी किंवा पेशंटला नसेतून इंजेक्शन दिले जातात तेव्हा अशा रेझिस्टन्ट बॅक्टेरियाचा प्रवेश आणि प्रसार होऊ शकतो. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या सर्व नर्सिंग स्टाफने तसेच डॉक्टर यांनी हाताची स्वच्छता करणे महत्त्वाचे आहे.

Antibiotic resistance  कारणे

  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःहून अँटिबायोटिक्स घेणे.
  • कारण नसताना जास्त काळासाठी किंवा कमी काळासाठी अँटिबायोटिक्स घेणे तसेच डॉक्टरांनी दिलेला अँटिबायोटिकचा कोर्स पूर्ण न करणे.
  • व्हायरल इन्फेक्शनमध्ये अँटिबायोटिक्सची गरज नसते. (उदा.फक्त सर्दी व खोकला असेल, तरीसुद्धा अँटिबायोटिक देणे.)
  • मुदतबाह्य झालेले किंवा उरलेली अँटिबायोटिक्स योग्य विल्हेवाट न लावता पाण्याच्या स्रोतात फेकून देणे. पशुपक्ष्यांमध्ये अँटिबायोटिक्सचा सर्रास वापर करणे.
  • डॉक्टरांनी पूर्वी दिलेल्या अँटिबायोटिक स्वतःहून पुनःपुन्हा वापरणे.
  • काही अ‍ॅलर्जीच्या आजारांमध्येसुद्धा गरज नसताना अँटिबायोटिक वापरणे.

या सर्व कारणांमुळे अँटिबायोटिक रेझिस्टन्स वाढत जातो. बर्‍याचदा पेशंट डॉक्टरना अँटिबायोटिक्स लिहून द्या, त्याशिवाय आम्हाला बरे वाटत नाही, असे म्हणतात. त्यामुळे डॉक्टरसुद्धा नाईलाजाने अँटिबायोटिक लिहून देतात. परंतु, हे चुकीचे आहे.पेशंटचा आजार पाहून त्याला गरज असेल, तरच अँटिबायोटिक्स देणे योग्य आहे.

  • अँटिबायोटिक रेझिस्टन्स कमी करण्यासाठी अँटिबायोटिक्सचा नियंत्रित वापर करणे.
  • अँटिबायोटिक्स केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.
  • कोर्स पूर्ण होण्यापूर्वीच बरे वाटू लागले, तरीही कोर्स पूर्ण करावा, तसेच वेळच्यावेळी डोस न चुकता घ्यावा.
  • किरकोळ आजारांसाठी डॉक्टर व फार्मासिस्टकडे अँटिबायोटिक्सचा आग्रह करू नये.

Antibiotic resistance : वैयक्तिक व सामाजिक स्वच्छता महत्त्वाची

अँटिबायोटिक्सचा वापर कमी करावा लागावा यासाठी जंतुसंसर्ग इन्फेक्शन रोखण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी साबण व पाण्याने हात स्वच्छ धुणे, वैयक्तिक व सामाजिक स्वच्छता, लसीकरण, शुद्ध पाणी व सांडपाण्याची योग्य व्यवस्था असे विविध पातळ्यांवरचे सर्वश्रुत उपाय अमलात आणणे जरुरीचे आहे.

अँटिबायोटिक सुरू करण्यापूर्वी योग्य तपासण्या करणे आवश्यक

डॉक्टरांनी पेशंटना जंतुसंसर्ग असण्याची शक्यता वाटल्यास अँटिबायोटिक सुरू करण्यापूर्वी योग्य तपासण्या उदाहरणार्थ, सीबीसी, सीआरपी, कल्चर करणे आवश्यक आहे. त्यामुळे आजार कोणत्या जंतूंमुळे होतो. त्याला कोणती औषधे लागू पडतात हे अचूक कळते व योग्य औषधे दिल्यामुळे अँटिबायोटिक रेझिस्टन्स कमी करू शकतो.

अँटिबायोटिक रेझिस्टन्स कमी करण्यासाठी अँटिबायोटिक रेझिस्टन्सबद्दल समाजात जागरुकता वाढविणे आवश्यक आहे. या द़ृष्टीने भारत सरकारकडून सूक्ष्मजीव प्रतिरोध राष्ट्रीय कार्य योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यामधील एक मुद्दा म्हणजे प्रभावी रोग संक्रमण प्रतिबंध आणि नियंत्रण म्हणजेच इन्फेक्शन प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल हे आहे.

अँटिबायोटिक्सचा बेसुमार वापर करणे याचे दुष्परिणाम आज दिसत आहेत. हे जर थांबवले नाही, तर पुढच्या काळासाठी कदाचित प्रभावी अँटिबायोटिक्स उरणारच नाहीत. यासाठी अँटिबायोटिक रेझिस्टन्सबद्दल समाजामध्ये जागरुकता वाढवून एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.

  • डॉ. रश्मी पोवार

Back to top button