नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीतील महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहचला आहे. बुधवारी (दि.२० नोव्हे) आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मलका गंज परिसरात प्रचार केला. पंरतु, त्यांच्या रोड शो दरम्यान आप च्या तब्बल २० नेत्यांचे फोन चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आप आमदार अखिलेश त्रिपाठी, आप नेत्या गुड्डी देवी, आमदार सोमनाथ भारतीच्या सचिवांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, 'आप'ला सत्ता मिळाली तर केवळ तीन ते चार महिन्यांमध्येच एमसीडीतील भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट करू,असे आश्वासन रॅलीला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी दिले. एमसीडीतून काम करवून घेण्यासाठी नागरिकांना आता पैसे देण्याची आवश्यकता राहणार नाही. केजरीवाल यांनी आप उमेदवारांच्या समर्थनार्थ कमला नगर जवळील मलका गंज चौकातून घंटा घर चौकापर्यंत रोड शो केला.