Nashik : शेतकरी पुढे अन् मांजरीच्या पावलाने बिबट्या मागे, वीस मिनिटे रंगला थरार | पुढारी

Nashik : शेतकरी पुढे अन् मांजरीच्या पावलाने बिबट्या मागे, वीस मिनिटे रंगला थरार

नाशिक, सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील ठाणगाव शिवारातील भिकरवाडी परिसरात शेतकरी पुढे अन् मांजरीच्या पावलाने बिबट्या मागे, असा जवळपास वीस मिनिटे थरार सुरू होता. शेतकर्‍याने कसेबसे स्वत:ला वाचविले. भास्कर मुरलीधर आंधळे यांनी आपबिती कथन केली. घरात पोहोचताच सुटकेचा निःश्वास टाकला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भिकरवाडी परिसरात भास्कर आंधळे हे गट नंबर 1450 मध्ये कुटुंबासह अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. शुक्रवारी (दि. 11) सायंकाळी 5.30 ते 6 च्या दरम्यान आंधळे हे शेतीसाठी रात्रीची वीज असल्याने पिकांना पाणी देण्याच्या हेतूने विद्युतपंपाला पाइप फिटिंग करून ठेवत होते. त्याच दरम्यान अचानक आंधळे यांच्यासमोर बिबट्या उभा ठाकला. बिबट्याला पाहताच आंधळे यांची पाचावर धारण बसली. त्यांनी प्रसंगावधान राखत धैर्याने सावकाश पावले टाकत घरचा रस्ता धरला. हाकेच्या अंतरावर असणार्‍या घरापर्यंत यायला त्यांना बराच वेळ लागला. हळूहळू बिबट्या मागे अन् आंधळे पुढे, असा थरार जवळपास पंधरा ते वीस मिनिटे सुरू होता. त्यानंतर आंधळे यांनी घरात शिरून कुटुंबीयांना आपबिती सांगितली. कुटुंबीयांनी दारे-खिडक्या बंद करून घेत स्वसंरक्षण केले. यापूर्वी बिबट्याने या परिसरात पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. त्यामुळे पशूपालकदेखील धास्तावलेले आहेत. वनविभागाने या भागातून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

बिबट्याच्या जोडीचे वास्तव्य
भिकरवाडी परिसरात बिबट्याचा कायमच वावर असून, 24 ऑक्टोबरला अडीच वर्षीय बछडा पिंजर्‍यात अडकला होता. त्यानंतर रात्री-अपरात्री बिबट्याची जोडी शेतकर्‍यांच्या द़ृष्टीस पडत होती. भिकरवाडी परिसरात घनदाट झाडी असल्याने तिकडे शेतकरीही फिरकत नव्हते. मात्र, आता जंगल सोडून बिबटेच मानवी वस्तीकडे चाल करू लागल्याने शेतकरी धास्तावले आहेत. पिंजरा लावण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

हेही वाचा :

Back to top button