कोपरगाव : बाजार समित्या प्रारुप मतदारयादी; 23 नोव्हेंबरपर्यंत हरकती | पुढारी

कोपरगाव : बाजार समित्या प्रारुप मतदारयादी; 23 नोव्हेंबरपर्यंत हरकती

कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील अहमदनगरसह बारा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरु झाली. त्यासाठी 1 सप्टेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारित प्रारुप मतदार यादी सोमवारी प्रसिध्द झाली आहे. या मतदार यादीवर 23 नोव्हेंबरपर्यंत हरकती मागविण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गणेश पुरी यांनी सांगितले.

कोरोनामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. शेतकर्‍यांचे व राजकीय पदाधिकार्‍यांचे लक्ष लागलेल्या बाजार समित्यांच्या सन 2022-23 ते 2027-28 या कालावधीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरु झाली आहे. अहमदनगर, श्रीगोंदा, पारनेर, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, जामखेड व कर्जत या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश आहे.

बाजार समिती निवडणुकीचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपनिबंधक पुरी यांनी अहमदनगरसह बारा बाजार समित्यांची प्रारुप मतदार यादी सोमवारी (दि.14) प्रसिध्द केली. ही यादी उपनिबंधक सहकारी संस्था तसेच बारा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कार्यालयांच्या फलकावर उपलब्ध केली आहे.

या मतदार यादीवर सोमवारपासून हरकती मागविण्यात आलेल्या आहेत. कार्यालयीन वेळेत 23 नोव्हेंबरपर्यंत हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. उपलब्ध होणार्‍या हरकतींवर 2 डिसेंबरपर्यंत सुनावणी होणार असून, त्याबाबत जिल्हा उपनिबंधक पुरी निर्णय घेणार आहेत. त्यानंतर 7 डिसेंबर 2022 रोजी बाजार समितींची अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे.

Back to top button