करिअरचा ‘फिटनेस’ | पुढारी

करिअरचा ‘फिटनेस’

आज फिटनेसला विशेष महत्त्व आले आहे. फिटनेसच्या केंद्रस्थानी जिम आहे. देशात 40 लाखांहून अधिक युवकांना जिमच्या माध्यमातून थेट रोजगार मिळत आहे. गेल्या दोन दशकापासून फिटनेस क्षेत्र वेगाने वाढत चालले आहे. हे क्षेत्र आता थांबणार नाही.

कोव्हिड काळानंतर शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती अर्थात फिटनेसचे महत्त्व सर्वांना अत्यंत योग्यपद्धतीने कळाले आहे. आजच्या काळात बहुतांश मंडळी, विशेषत: युवा मंडळी हेल्थ, फिटनेसवरून सजग आहेत. आपणही फिटनेसकडे विशेष लक्ष देत असाल आणि दुसर्‍या व्यक्तीलाही फिट राहण्यासाठी प्रेरित करत असाल तर फिटनेस ट्रेनर म्हणून उत्तम करिअर करू शकता.

आज फिटनेसला विशेष महत्त्व आले आहे. फिटनेसच्या केंद्रस्थानी जिम आहे. देशात 40 लाखांहून अधिक युवकांना जिमच्या माध्यमातून थेट रोजगार मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते, 2030 पर्यंत या उद्योगात मंदी येणार नाही. याचाच अर्थ असा की, या क्षेत्रात करिअर करण्याची आपल्याला आवड असेल आणि आपण स्वत:ही फिट असाल तर फिटनेस ट्रेनर, जिम हे रोजगाराची चांगली संधी म्हणून पाहता येईल. सोशल मीडियात वाढती सक्रियता आणि आरोग्याबाबत वाढती जागृती लक्षात घेता देशात बहुतांश महानगर, शहरांत, तालुका पातळीवर गल्लीबोळात जिम, फिटनेस सेंटर सुरू झाले आहेत.

मागणीत वाढ : देशभरात जिम आणि फिटनेस सेंटरवर कुशल ट्रेनर मंडळींच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. केवळ डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या प्रशिक्षकांची भारतात कमतरता नाही. परंतु स्वत: फिट असणारे आणि आपल्या अनुभवाचा लाभ
अन्य लोकांना देणार्‍या मंडळींचा अभाव प्रकर्षाने दिसून येतो. देशात सुमारे 5 हजार कुशल ट्रेनरची तातडीची गरज आहे. फिजिकल ट्रेनरला वाढती मागणी लक्षात घेता देशातील अनेक विद्यापीठ, फिजिकल सेंटर तसेच अन्य शैक्षणिक संस्थांनीदेखील मोठ्या प्रमाणात फिटनेस ट्रेनिंग अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

अनेक अभ्यासक्रम उपलब्ध : या क्षेत्रात अनेक प्रकारचे अभ्यासक्रम आहेत. बॅचलर इन फिजिकल एज्युकेशन म्हणजेच बीपीएड कोर्स हा लोकप्रिय आहे. सेंट्रल कौन्सिलिंग इन योगा अँड नॅचुरोपॅथीमध्यही फिटनेस ट्रेनिंगचा एक वर्षाचा डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. याशिवाय स्पोर्टस् अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया देखील स्पोर्टस् आणि अ‍ॅथलिट कोचिंग अभ्यासक्रम उपलब्ध करून देते. यात पीजी डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहेत.

प्रवेश प्रक्रिया : कोणत्याही उमेदवाराने किमान 50 टक्के गुणांसह पदवी प्राप्त करणे गरजेचे आहे. डिप्लोमा अभ्यासक्रम करायचा असेल तर त्याची किमान शैक्षणिक पात्रता ही बारावी उत्तीर्ण आणि वय 18 असणे गरजेचे आहे.
वैयक्तिक गुण कौशल्य : फिटनेस ट्रेनर होण्यासाठी इच्छुक उमेदवाराला शारीरिक संरचनेची चांगली जाण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तांत्रिक माहिती आणि कुशल वक्ता असणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

रोजगाराची संधी : जिम, हेल्थ सेंटर, नॅच्युरोपॅथी, योगा केंद्र, पर्सनल ट्रेनर म्हणून नोकरी करता येते. याशिवाय शाळा, क्रीडा संस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्रात, विशेषत: सेवा क्षेत्रातील कंपन्या देखील आजकाल फिजिकल ट्रेनरची सेवा घेत आहेत. अनेक प्रशिक्षित फिजिकल ट्रेनर हे स्वत:चे जिम किंवा हेल्थ सेंटर सुरू करू शकतात.

उत्पन्न : या क्षेत्रातील उत्पन्नाचा विचार केल्यास फिजिकल ट्रेनरचे उत्पन्न निश्चित नाही. विविध प्रशिक्षण संस्थेत अध्यापनाचे कार्यदेखील करता येते. सरकारी नोकरीत वेतनमान निश्चित असते. याशिवाय खासगी संस्था, क्लब, जिम किंवा हेल्थ सेंटरमध्ये वेतनश्रेणीत फरक असतो. तरीही साधारणपणे एका फिजिकल ट्रेनरला दहा ते वीस हजार रुपये मासिक वेतन मिळते. जर आपण कुशल असाल आणि लोकप्रिय होत असाल तर आपले उत्पन्न मासिक लाखाच्या घरात जाऊ शकते.

अनिल विद्याधर 

Back to top button