आला हिवाळा, कान-डोळे सांभाळा; वातावरणातील बदलाने संसर्गामध्ये लक्षणीय वाढ | पुढारी

आला हिवाळा, कान-डोळे सांभाळा; वातावरणातील बदलाने संसर्गामध्ये लक्षणीय वाढ

पुणे : यंदा शहराने दिवाळीच्या आदल्या दिवसापर्यंत मुसळधार पावसाचा अनुभव घेतला. हवेतील बदलामुळे डोळे आणि कानांमधील संसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. फ्लूच्या साथीनंतर आता डोळे आणि कानांमध्ये खाज सुटणे, सूज येणे, डोळे लाल होणे आणि सतत पाणी येणे, अशा समस्या वाढल्याचे महत्त्वाचे निरीक्षण नेत्रतज्ज्ञ आणि कान-नाक-घसातज्ज्ञांनी नोंदविले आहे.

दिवाळीपासून थंडीचा कडाकाही अचानक वाढला आहे. सध्या विषाणू आणि जीवाणूंच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने विषाणुजन्य आणि जीवाणुजन्य आजारांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: डोळ्यांशी संबंधित व्हायरल कन्जंक्टिव्हायटिस आणि कानांचा संसर्ग अचानक वाढला आहे. बहुतांश वेळा डोळ्यांना होणारा संसर्ग व्हायरल असल्याने नेत्रतज्ज्ञ अँटिव्हायरल आणि सौम्य स्टेरॉइडवर भर देत आहेत.

काय काळजी घ्यावी?
व्यक्तीनिहाय संपर्क आणि एकमेकांच्या वस्तू वापरल्यास हा संसर्ग सहज एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे पसरतो.
वारंवार डोळ्यांशी संपर्क टाळावा आणि वारंवार हात धुवावेत.
लहान मुले किंवा प्रौढ व्यक्तींमध्ये लक्षणे आढळल्यास संपूर्ण बरे वाटेपर्यंत घरीच राहण्याचा सल्ला देण्यात येतो.
डोळे, कान स्वच्छ आणि कोरडे ठेवा. कानात पाणी आल्यास वेदनाही होऊ शकतात. टोपी, हेडबँड किंवा स्कार्फ घालून शरीर ऊबदार ठेवण्याचा प्रयत्न करा.
वार्‍यापासून संरक्षण करण्यासाठी कानात कापूस वापरू नका. असे केल्याने कानाच्या आतील बाजूस जळजळ होऊ शकते.

डोळ्यांत काही बाहेरील घटक किंवा धूलिकण गेल्याने खाज निर्माण होते आणि कालांतराने लक्षणे वाढतात. डोळ्यांतून पाणी येणे, लालसरपणा, वेदना आणि पापण्यांना सूज येते. काहीवेळा सूज जास्त असल्याने डोळे उघडणेही अवघड असते. काही रुग्णांच्या डोळ्यांतून चिकट स्राव येतो, मेंब—ेन निर्मिती होते आणि काही प्रकरणांत रक्तस्राव होतो. अनेकदा बारीक ताप, घशाचा दाह इत्यादी व्हायरल तक्रारी जाणवतात.

                                                          – डॉ. सुधीर बाबुरडीकर, नेत्रतज्ज्ञ

थंडीमध्ये रक्ताभिसरण कमी होत असल्याने कानाच्या संसर्गामध्ये वाढ होते. आतील बाजूस होणार्‍या संसर्गात कानाच्या पडद्यामागे द्रव जमा होते. कानात जळजळ तसेच ओलावा किंवा संसर्गास कारणीभूत ठरणार्‍या जीवाणूंची लागण होते. हिवाळ्यात सायनुसायटिसच्या रुग्णांमध्येही वाढ होते. कान दुखणे, चक्कर येणे, डोकेदुखी, सूज येणे, असामान्य स्राव आणि तात्पुरते श्रवण कमी होणे, अशी लक्षणे दिसून येतात.

                                                                       – डॉ. आशुतोष मेहता,
                                                                        कान-नाक-घसातज्ज्ञ

Back to top button