विलास उजवणेंची ‘कुलस्वामिनी’ चित्रपटात प्रमुख भूमिका! | पुढारी

विलास उजवणेंची 'कुलस्वामिनी' चित्रपटात प्रमुख भूमिका!

पुढारी ऑनलाईन डेस्क : डॉ. विलास उजवणे हे नाव मराठी चित्रपटसृष्टीसाठी काही तसं नवीन नाही. आजवर अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमधून डॉ. विलास उजवणे यांनी आपल्या अभिनयाची छाप मराठी सिनेरसिकांच्या मनावर उमटवली आहे. तेवढ्याच ताकदीनं त्यांचा वावर हिंदी चित्रपटसृष्टीतही अनुभवायला मिळाला आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात नियतीनं त्यांना आजारपणाचा मोठा धक्का दिला. अर्धांगवायूच्या झटक्यामुळे त्यांचं वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही आयुष्यांना हादरा बसला. पण या गंभीर आजारावर धीरोदात्तपणे मात करत डॉ. विलास उजवणे पुन्हा उभे राहिले. आता ते आगामी ‘कुलस्वामिनी’ चित्रपटातून डॉ. विलास उजवणे त्यांच्या अभिनयाचे पैलू प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी सज्ज झाले आहेत.

देवीमातेच्या अगाध लीलेचं दर्शन प्रेक्षकांना घडवणारा ‘कुलस्वामिनी’ हा चित्रपट येत्या ११ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. अल्ट्रा मीडिया ॲड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडची निर्मिती आहे. जोगेश्वर ढोबळे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात अभिनेते डॉ. विलास उजवणे आणि अभिनेत्री चित्रा देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटात देवीमातेच्या भक्तीमध्ये वाहून घेतलेल्या कल्याणी देशमुख यांच्या पतीची, अर्थात बाळासाहेब देशमुख ही व्यक्तीरेखा विलास उजवणे साकारत आहेत. ज्या गावात हे सगळं कथानक घडतं, त्या गावातील एका प्रभावशाली व्यक्तीचं हे पात्र आहे.

कल्याणी ही व्यक्तीरेखा अभिनेत्री चित्रा देशमुख साकारत आहेत १९९२ साली प्रदर्शित झालेल्या ‘दौलत की जंग’ पासून या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘ढ लेकाचा’मधून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री चित्रा देशमुख हे नावही मराठी चाहत्यांमध्ये सर्वश्रुत आहे.

Back to top button