नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीगचे (आयपीएल) नवे चेअरमन अरुण धूमल यांच्या मते, आयपीएल ही पुढील पाच वर्षांत जगातील सर्वात मोठी लीग बनेल. तसेच महिला आयपीएलबाबत बोर्डाचे स्पष्ट धोरण आहे. आयपीएलने 2023 ते 2027 पर्यंतच्या सत्रांसाठी 48,390 कोटी रुपयांत मीडिया अधिकार विकले आहेत. यामुळे ही लीग आता सामन्याच्या मूल्याच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी लीग बनली आहे. आयपीएलच्या अडीच महिन्यांच्या सत्रात 10 संघामध्ये एकूण 94 सामने आयोजित करण्याची योजना आहे.
सध्या जगभरात क्रिकेट लीग स्पर्धा सुरू आहेत. यामुळे आपल्या खेळाडूंना या लीगमध्ये खेळविण्यासाठी बीसीसीआयवर दबाव वाढत आहे. यासंदर्भात बोलताना धूमल यांनी सांगितले की, विदेशी लीगमध्ये खेळण्यास भारतीय खेळाडूंना परवानगी न देण्यावर बीसीसीआय सध्या ठाम आहे. सैद्धांतिकपणे बीसीसीआयचा निर्णय असा आहे की, करारबद्ध असलेल्या आपल्या खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळू न देण्याचा आहे. यावर आम्ही आजही कायम आहोत.