‘टायटॅनिक’च्या अवशेषांजवळ आढळला ‘जैविक खजिना’ | पुढारी

‘टायटॅनिक’च्या अवशेषांजवळ आढळला ‘जैविक खजिना’

वॉशिंग्टन : बुडालेल्या जहाजाविषयीचे जगभरात आढळणारे सर्वाधिक कुतूहल हे ‘टायटॅनिक’ या जहाजाविषयीच असते. या जहाजाच्या दुर्घटनेवर आधारित हॉलीवूडपट निर्माण झालेला असल्याने त्याचे हे कुतूहल आणखी वाढले. ‘कधीही न बुडणारे जहाज’ अशी जाहिरात करून निघालेले हे भव्य जहाज आपल्या पहिल्याच सफरीत प्रवासाच्या केवळ चारच दिवसांनंतर उत्तर अटलांटिक महासागरात 1912 मध्ये बुडाले. हिमनगाला धडकून बुडालेल्या या जहाजाचे अवशेष आजही समुद्रात चार किलोमीटर खोलीवर दोन तुकड्यांमध्ये आहेत. सुमारे 26 वर्षांपूर्वी मिळालेल्या एका सोनार ब्लिपमुळे आता खुलासा झाला आहे की, अथांग समुद्राच्या तळाशी हे जहाज एकटेच नाही. त्याच्या शेजारीच ‘जैविक खजिना’ही आहे.

पीएच नार्गोलेट हे एक सबमर्सिबल पायलट आणि पाणबुडे आहेत. त्यांनी 1996 मध्ये इको साऊंडिंग उपकरण म्हणजेच सोनारच्या माध्यमातून टायटॅनिकजवळ रडारवर एक रहस्यमय वस्तू पाहिली होती. ती नेमकी काय आहे, हे समजू शकले नव्हते. याच वर्षीच्या प्रारंभी नार्गोलेट आणि अन्य चार संशोधकांनी रहस्यमय वस्तू शोधण्यासाठी एक अभियान चालवले. नार्गोलेट यांचे म्हणणे होते की, रडारवर पाहिलेला ब्लिप एखाद्या अन्य जहाज किंवा टायटॅनिकचाच भाग असू शकतो.

ब्लिपच्या जागेवर शोध केल्यावर तिथे एक खडक आढळला. हा खडक वेगवेगळ्या ज्वालामुखीय संरचनेपासून बनलेला होता. या ठिकाणी झिंगे, स्पंज आणि प्रवाळाच्या अनेक प्रजाती असण्याची शक्यता आहे. स्कॉटलंडमध्ये एडिनबर्ग विद्यापीठातील जैववैज्ञानिक मुरे रॉबर्टस् यांनी सांगितले की, हे ठिकाण जैविकरूपानेही आकर्षक आहे. या खडकाजवळ राहणारे जीव अगदी खोल महासागरात राहणार्‍या जीवांपेक्षा अतिशय वेगळे आहेत. नार्गोलेट यांनी अशा एका महत्त्वाच्या भागाचा शोध लावला आहे. त्यांना वाटले होते की, हा जहाजाचा एक हिस्सा असावा; मात्र हा त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचा आहे असे मला वाटते. समुद्र वैज्ञानिकांसाठी हा भाग एखाद्या खजिन्यासारखाच आहे.

Back to top button