हिंजवडीच्या हद्दीत गोळीबार सराइतांच्या अंगलट | पुढारी

हिंजवडीच्या हद्दीत गोळीबार सराइतांच्या अंगलट

पिंपरी : जमिनीच्या वादातून हिंजवडीत गोळीबार करणे सराईत गुन्हेगारांच्या अंगलट आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून जबरी जोरी, घरफोडीसारखे एकूण 16 गुन्हे उघडकीस आणले असून 8 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विक्की उर्फ विकास रजपूत (24, रा. गणेश मंदिरासमोर, वाकड), पृथ्वीराज राठोड (20, रा. भोसे, ता. खेड), ज्ञानेश्वर उर्फ काळ्या उर्फ शित्रुन राजपुत (20, रा. वाडे बोलाई, ता. हवेली, जि. पुणे), राजु अक्षय ठाकूर (20, रा. आकुर्डी स्टेशन जवळ, आकुर्डी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी येशू मारवाडी (28, वर्षे, रा. नेरे दत्तवाडी, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी येशू यांचा पुतण्या विक्की राजपूत याच्या बरोबर वाकड येथील जागेसंदर्भात वाद चालू होते. दरम्यान, आरोपी विकी राजपूत व त्याच्या साथीदारांनी 20 ऑक्टोबर रोजी फिर्यादी यांच्या घरी जाऊन गोळीबार केला. गोळ्या हाताला चाटून गेल्याने फिर्यादी थोडक्यात बचावले. त्यानंतर आरोपी घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तपास सुरु केला. दरम्यान आरोपी कस्तुरे चौक परिसरातून दोन दुचाकींवरून पळून जात असल्याची माहिती तपास पथकाचे सहायक निरीक्षक राम गोमारे यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून त्याच्याकडून पिस्तूलसह चार जिवंत काडतुसे जप्त केली.

आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी 25 सप्टेंबरला सोनाराला मारहाण करून 40 तोळे सोन्याचे दागिने व 30 किलो चांदी चोरल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यातील 9 तोळे 2 ग्रामचे दागिने जप्त करण्यात आले. तसेच, आरोपींनी हिंजवडी, निगडी, पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, जबरी चोरी व घरफोडीचे एकूण 16 गुन्हे केल्याचे उघडकीस आले. यातील चोरीला गेलेला एकूण 8 लाख 17 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील दहिफळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोन्याबापु देशमुख, तपास पथकाचे प्रमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस उपनिरीक्षक रमेश पवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Back to top button