मंचर : देशातील साखरेला बाजार भाव मिळणार: दिलीप वळसे पाटील यांचे मत | पुढारी

मंचर : देशातील साखरेला बाजार भाव मिळणार: दिलीप वळसे पाटील यांचे मत

मंचर; पुढारी वृत्तसेवा: युरोप, ब्राझील यासारख्या देशांमध्ये वातावरणातील बदलामुळे पिकांवर परिणाम झाला असून साखरेत अग्रेसर असणारा ब्राझील देशात दुष्काळ असल्याने ब्राझीलची साखर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आली नाही. आपल्या देशातील साखरेला चांगला बाजार भाव मिळून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना त्याचा आर्थिक फायदा होईल, असे मत माजी गृहमंत्री आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.

पारगाव दत्तात्रयनगर (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा 23 वा बॉयलर अग्निप्रदिपन व गव्हाण पूजन समारंभ माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते झाला. या वेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, सूर्यकांत पलांडे, भीमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गावडे, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा, मंचर बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम, कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील, माजी सभापती संजय गवारी, भगवान वाघ, युवा नेत्या पूर्वा वळसे पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, कार्यालयीन प्रमुख रामनाथ हिंगे यांच्यासह संचालक, ऊस उत्पादक शेतकरी आणि वारकरी संप्रदायातील संत-महंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना परिसरातील अनेक साखर कारखान्यांनी आपली गाळप क्षमता वाढवली असून भविष्यात पारनेर, दौंड येथील बंद पडलेले साखर कारखाने सुरू होणार आहेत. त्यामुळे कारखाना परिसरात उसाची पळवापळवी होणार असून हा प्रश्न गंभीर होणार आहे.

शेतकर्‍यांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला ऊस देण्यासाठी आगाऊ नोंदणी करावी, त्यानुसार प्राधान्याने उसाची तोडणी केली जाईल, असे वळसे पाटील म्हणाले. शेतकर्‍यांनी एकरी उसाचे जास्त उत्पादन होण्यासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे. भीमाशंकरचा 16 मेगावॅट अतिरिक्त वीजनिर्मितीचा प्रकल्प लवकरच सुरू केला जाणार असून तसेच इथेनॉल निर्मितीचा प्रकल्पही लवकर सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, शेतकर्‍यांना एफआरपी देण्यास कधीही उशीर केला नाही. कारखान्याने ऊस लागवड आणि शेतकर्‍यांना जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेण्यासाठी नेहमीच मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी भीमाशंकरला आपला हक्काचा ऊस देऊन उत्तम प्रकारे आर्थिक नियोजन करावे, असे आवाहन केले.

याप्रसंगी माजी आमदार पोपटराव गावडे, सूर्यकांत पलांडे, ह.भ.प. पांडुरंग महाराज येवले, हिरामण महाराज कर्डिले, नवनाथ महाराज माशेरे, सुरेखाताई शिंदे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन भीमाशंकरचे ऊस विकास अधिकारी दिनकर आदक यांनी तर आभार ज्येष्ठ संचालक दादाभाऊ पोखरकर यांनी मानले.

यावर्षी 12 लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट
भीमाशंकर कारखान्याने यावर्षीच्या ऊस गळीत हंगामात 12 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, कारखाना प्रतिदिन साडेसहा हजार मेट्रिक टन ऊस गाळप करणार आहे. कारखान्याची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऊस उत्पादक शेतकर्‍यांची दिवाळी गोड करू व साखर वाटप, कामगारांचा बोनस हे प्रश्न मार्गी लावू, असे दिलीप वळसे पाटील यांनी या वेळी सागितले.

 

Back to top button