नानगाव : दादा, बाप्पू… जरा रस्त्याचं तेवढं बघा | पुढारी

नानगाव : दादा, बाप्पू... जरा रस्त्याचं तेवढं बघा

राजेंद्र खोमणे
नानगाव : मोठ्या रस्त्याचे काम होईल तेव्हा होईल. मात्र, सध्या आम्हाला हाडांच्या आजारांनी चांगलेच ग्रासले आहे. त्यामुळे ‘दादा, बाप्पू… जरा या रस्त्याच्या कामाचं तेवढं बघा, नाहीतर तुम्हाला मतदान करण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत चालत येणे देखील कठीण होईल. त्यामुळे लवकरात लवकर रस्त्यावरील खड्डे बुजवा,’ अशी मागणी चौफुला-न्हावरा मार्गावरील नागरिक करीत आहेत.
शिरूर तालुक्यातील नागरगाव ते न्हावरा या मार्गावर तर खूपच मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे.

रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, हेच कळत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत, की कोणता खड्डा चुकवावा, हे देखील वाहनचालकांना समजत नाही. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या अवजड वाहनांची गर्दी दिसून येते. मोठ्या वाहनांनी वाहतूक कोंडी होऊन खराब रस्त्याचा सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा रुग्णवाहिकांना रस्त्यावर प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते. एखाद्या रुग्णाला अत्यावश्यक सेवा मिळाली नाही, तर त्याचा मध्येच मृत्यू देखील होऊ शकते. त्यामुळे अशा घटना घडल्या, तर याला जबाबदार कोण? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर खडी निघत आहे, खडी खड्ड्यात व आजूबाजूला पसरलेली असते. या पसरलेल्या खडीवरून दुचाकी घसरून अपघात होतात. दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल आणि शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार हे दोन्हीही नेते आपापल्या कामांमुळे महाराष्ट्रात ओळखले जातात. कुल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे, तर आमदार अशोक पवार हे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात. कुल यांना जेवढे पारगाव, केडगाव व चौफुला महत्त्वाचे आहे तसेच पवार यांना नागरगाव, न्हावरा महत्त्वाचा आहे. त्यामुळे ‘दादा, बाप्पू… जरा रस्त्याचं बघा,’ असे स्थानिक बोलून दाखवत आहेत.

गेली अनेक दिवसांपासून या रस्त्याची देखभालदुरुस्ती करीत आहोत. हा रस्ता काळ्या मातीमधील असून, खूप जुना झाला आहे. त्यामुळे रस्त्यावर सतत खड्डे पडत आहेत. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक सुरू असल्याने व रस्ता खूप जुना झाल्याने खड्ड्यांच्या समस्या निर्माण होत आहेत. रस्त्याच्या कडेला अतिक्रमण असल्याने चरदेखील खोदता येत नाही. त्यामुळे रस्त्याच्या कडेला व रस्त्यावर पाणी साठले जाते.

ए. आर. खबीले, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
या रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या अनेक दिवसांपासून आहे. यासंदर्भात संबंधित विभागाला निवेदनदेखील दिले होते. वारंवार बुजविण्यात येणारे खड्डे व दुरुस्तीची कामे निकृष्ट होत असल्याने हा प्रश्न सतत भेडसावत आहे. आज बुजविण्यात आलेल्या खड्ड्यांची परिस्थिती दोन दिवसांत पुन्हा ‘जैसे थे’ होते. दुरुस्तीची कामे चांगली व्हावी. वैभव बोत्रे, नागरिक, पारगाव सा.मा.

Back to top button